दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) -:
कळंब (धाराशिव):
स्वातंत्र्यापासून एसटी बस सेवेपासून वंचित असलेल्या भोसा (ता. कळंब) गावकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. राकाँपा (शरदचंद्र पवार पक्ष) कळंब तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे आणि ग्रामस्थांनी आगार प्रमुखांकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, गावात पहिल्यांदाच एस.टी. बसचे दिमाखात आगमन झाले. या ऐतिहासिक क्षणाचे गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहात स्वागत केले.
अडचणींवर मात करत मार्ग काढला:
भोसा हे गाव गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर होते. तेरणा नदीवर पूल नसल्यामुळे महामंडळाला बस सेवा सुरू करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य होते. मात्र, नुकतेच नदीवर पूल बांधण्यात आल्यानंतर आणि प्रशासनाच्या सूचनेनुसार रस्त्याची साईडपट्टी दगड-मुरमाने व्यवस्थित भरून घेतल्यानंतर बसचा मार्ग मोकळा करण्यात आला.
विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार:
गावातून गौर येथे माध्यमिक शिक्षणासाठी जाणाऱ्या सुमारे ५० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना तसेच कळंब व धाराशिव येथे उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या तरुणांना दररोज अनेक किलोमीटर पायी प्रवास करावा लागत होता. उन्हाळा-पावसाळ्यात तर ही समस्या अधिक बिकट व्हायची. बस सेवा नसल्यामुळे अनेक मुलींना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत होते. आता हक्काची बस सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी आगार प्रशासनाचे आभार मानत, चालक व वाहकांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यासाठी प्रा. तुषार वाघमारे, जिक्राईल पटेल, मुसद्दीक काझी, वाहेद पटेल, राकेश ताकपिरे, चेतन वाघमारे, आदींनी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.
याप्रसंगी प्रा.तुषार वाघमारे यांनी या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कळंब आभार प्रमुख घोलप यांचे विशेष आभार व्यक्त केले.