दर्पण न्यूज मुंबई :- राज्याची वाढती विजेची गरज व मागणी पूर्ण करणे व भविष्यातील विजेची मागणी लक्षात घेता महावितरणने दीर्घकालीन मागणी संसाधन पर्याप्तता योजनेनुसार पुढील पाच वर्षाकरिता नियोजन केले आहे. यानुसार पाच वर्षाकरिता ४३ हजार ८७० मे. वॅ. वीज खरेदी करार करण्यात आले आहेत. ही वीज क्षमता टप्प्याटप्प्याने स्थापित होऊन २०३१- २०३२ अखेर महावितरणची वीज निर्मिती स्थापित क्षमता ७८ हजार ५९१ मे. वॅ. इतकी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
राज्यातील वीज निर्मिती संच तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याने निर्माण झालेल्या वीज तुटवड्याबाबत सदस्य हेमंत ओगले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील काही भागांत औद्योगिकीकरणामुळे तर काही ठिकाणी वाढलेल्या उन्हाळ्यामुळे वीज मागणी वाढली. राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत वीज मागणीत १९.५ टक्क्यांनी वाढ झाली. या वाढीव मागणीनुसार ही वीज उपलब्ध करुन देण्यात आली. यंदा उन्हाळा वाढल्याने राज्याने खुल्या बाजारातून वीज खरेदी करताना पूर्वीप्रमाणे प्रतियुनिट ११ रुपये मोजण्याऐवजी केवळ ४ रुपये ६० पैशांच्या दराने वीज उपलब्ध करून घेतली. यासाठी यापूर्वी करण्यात आलेल्या करारांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे कमी दरात वीज खरेदी शक्य झाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, वीज खरेदी आणि कोळसा पुरवठा प्रक्रियेत असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून, ‘सॅम्पलिंग’ प्रक्रियेत बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वीच्या करारांमधील त्रुटी दूर करून नव्याने करार आणि निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले की, ज्या सब स्टेशनवर अधिक लोड आहे अशा ठिकाणी फिडर सेपरेशन करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे; तसेच तांत्रिक कारणास्तव बंद पडलेले संच प्राधान्याने दुरुस्त करून ते कार्यान्वित करण्यात आले आहेत. कोराडी आणि चंद्रपूर येथे प्रत्येकी ८०० मेगावॅट क्षमतेच्या सुपर क्रिटिकल वीज प्रकल्पांबाबतचा प्रस्तावही विचाराधीन आहे. या प्रकल्पांबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नसला तरी भविष्यात जुन्या सबक्रिटिकल प्रकल्पांच्या जागी आधुनिक सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज प्रकल्प उभारण्याचा राज्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य विकास ठाकरे, शेखर निकम, विजय वडेट्टीवार यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.