दर्पण न्यूज मिरज / सांगली :- केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांच्या हयात दाखल्याबाबत Beneficary Satyapan App विकसित केले आहे. या ॲपद्वारे केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे Digital Life Certificate (DLC) म्हणजे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने जनरेट करावयाचे आहे, असे आवाहन संजय गांधी योजना सांगली शहर तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना तसेच राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांनी सत्यापन ॲपद्वारे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन करून घेणे आवश्यक आहे. हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन करून घेण्याकरिता सोबत आधार कार्ड, मोबाईल व बँक पासबुक घेऊन जवळील सेतू केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जावे.
ज्या लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन करून घेतले आहे त्याच लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान प्राप्त होणार आहे. सत्यापन ॲपवर हयातीचे प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन न होणारे लाभार्थी हे माहे जुलै २०२६ पासून या योजनेच्या अनुदानापासून वंचित राहू शकतात. संबंधितांनी आवश्यक कागदपत्रासह त्वरित संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.