दर्पण न्यूज विटा, प्रतिनिधी (शिराज शिकलगार): -सुप्रसिद्ध साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रेरणादायी लेखक रघुराज मेटकरी यांच्या ‘माझे विद्यार्थी’ या गाजलेल्या पुस्तकाची निवड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या बी.ए. भाग-३ च्या अभ्यासक्रमासाठी करण्यात आली आहे. या निवडीमुळे साहित्य, शिक्षण आणि विद्यार्थी विकास क्षेत्रातील मेटकरी यांच्या कार्याला आणखी एक महत्त्वाची शैक्षणिक मान्यता मिळाली आहे.
‘माझे विद्यार्थी’ हे पुस्तक साधना प्रकाशन, पुणे यांनी सन २०१५ मध्ये प्रकाशित केले आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनातील संघर्ष, जिद्द, कर्तृत्व, यश आणि शिक्षक-विद्यार्थी नात्याचे हृदयस्पर्शी चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे. वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून ते शिक्षक, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींमध्ये विशेष लोकप्रिय ठरले आहे.
रघुराज मेटकरी यांच्या साहित्यसंपदेचा विचार करता त्यांची आजपर्यंत ५३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कादंबरी, चरित्र, ललित लेख, कविता, प्रेरणादायी साहित्य आणि शैक्षणिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
यापूर्वीही त्यांच्या साहित्याची शैक्षणिक क्षेत्रात दखल घेण्यात आली आहे. कर्नाटक शासनाच्या इयत्ता दहावीच्या ‘साहित्य सरिता’ या पाठ्यपुस्तकात ‘माझे विद्यार्थी’ या पुस्तकातील ‘शिल्पा दर्याबा चव्हाण’ हा पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच गोविंदराम शेखरिया स्वायत्त महाविद्यालय, बेळगावी यांनी बी.एस्सी. आणि बी.सी.ए. अभ्यासक्रमासाठी ‘माझे विद्यार्थी’ या पुस्तकाची निवड केली आहे. त्यामुळे दोन विद्यापीठे आणि विविध उच्च शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये या पुस्तकाचा समावेश होण्याचा मान मेटकरी यांच्या साहित्याला प्राप्त झाला आहे.
रघुराज मेटकरी यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या ‘होमी भाभा’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा ग. ह. पाटील पुरस्कार प्राप्त झाला आहे. याशिवाय आचार्य अत्रे पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी पुरस्कार, मातोश्री साहित्य माता हौसाबाई काळे पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
‘माझे विद्यार्थी’ या पुस्तकाची बी.ए. भाग-३ च्या अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर तसेच भारती विद्यापीठ, पुणेचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी रघुराज मेटकरी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
रघुराज मेटकरी यांच्या साहित्याला मिळालेल्या या शैक्षणिक मान्यतेमुळे साहित्यविश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विटा परिसरासह राज्यभरातील साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक संस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘माझे विद्यार्थी’ या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थीजीवनातील प्रेरणादायी अनुभव नव्या पिढीपर्यंत पोहोचणार असल्याने या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.