दर्पण न्यूज पलूस /प्रतिनिधी :-
कृष्णा नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या उपसा सिंचन योजनेवरील बंदीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची दखल घेत कर्तव्यदक्ष आमदार विश्वजीत कदम यांनी तत्परतेने पुढाकार घेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सिंचनासाठी आवश्यक असलेल्या कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने हजारो शेतकऱ्यांसमोर पिकांचे संरक्षण आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या भावना जाणून घेत आमदार कदम यांनी तातडीने महावितरण आणि पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक पाठपुरावा करत कृषी पंपांचा विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले. त्यांच्या या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला नवसंजीवनी मिळाली असून चिंतेचे वातावरण दूर झाले आहे.
आमदार विश्वजीत कदम यांच्या संवेदनशील, सकारात्मक आणि शेतकरीहिताच्या भूमिकेमुळे कृष्णाकाठावरील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे हास्य फुलले आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
या महत्त्वपूर्ण प्रयत्नांबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार विश्वजीत कदम यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून, त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.