दर्पण न्यूज पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती घटकांतील पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या गटई कामगारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या “गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देणे” या योजनेंतर्गत पुणे विभागातील पात्र लाभार्थ्यांसाठी १०२ गटई स्टॉल मंजूर करण्यात आले आहेत.
या योजनेंतर्गत पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील अनुसूचित जाती घटकांतील चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्ती व्यवसाय करणाऱ्या पात्र गटई कामगारांना टप्प्याटप्प्याने पत्र्याचे स्टॉल उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. या गटई स्टॉलमुळे लाभार्थ्यांना सुरक्षित आणि सुसज्ज व्यवसायस्थळ उपलब्ध होणार असून त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच उत्पन्नवाढ, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्वावलंबनाला बळकटी मिळण्यास हातभार लागणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाच्या प्रादेशिक उपआयुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.