मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोषाध्यक्ष, विद्यमान उपाध्यक्ष, विटा नगरीचे दानशूर व्यक्तिमत्त्व आणि शिक्षण क्षेत्रातील एक निस्वार्थी कार्यकर्ते आदरणीय सुधाकर शेठ शहा (सुधाभाई) यांच्या निधनाची बातमी मनाला अत्यंत वेदनादायी ठरली. त्यांच्या अकाली जाण्याने केवळ मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच नव्हे तर संपूर्ण विटा परिसराने एक कर्तृत्ववान, संवेदनशील आणि माणुसकी जपणारा आधारवड गमावला आहे.
सन २००१ मध्ये मी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो. त्या काळात संस्थेच्या उभारणीसाठी आणि विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या अनेक मान्यवरांच्या सहवासात येण्याचे भाग्य मला लाभले. त्यामध्ये संस्थेचा एक भक्कम आणि मजबूत आधारस्तंभ म्हणजे आदरणीय सुधाकर शेठ शहा. संस्थेच्या जडणघडणीत आणि विकासात त्यांचे योगदान अतुलनीय होते.
सुधाभाई म्हणजे माणुसकीचा अखंड वाहणारा झरा. संस्थेतील प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक सेवक यांच्याबद्दल त्यांच्या मनात अपार आत्मीयता होती. त्या काळात मॉडर्न एज्युकेशन सोसायटीतील बहुतांश कर्मचारी विनाअनुदानित विभागात कार्यरत होते. मर्यादित वेतनावर संसाराचा गाडा ओढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी, त्यांच्या कुटुंबातील समस्या आणि त्यांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न सुधाभाई नेहमी करत असत. एखाद्या कर्मचाऱ्यावर संकट कोसळले तर ते केवळ सहानुभूती व्यक्त करून थांबत नसत, तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असत. त्यांच्या या स्वभावामुळे कर्मचारी त्यांना केवळ पदाधिकारी म्हणून नव्हे, तर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती म्हणून मानत होते.
संस्थेच्या विकासासाठी त्यांनी कधीही आखडता हात घेतला नाही. शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना असलेली तळमळ आणि बांधिलकी विलक्षण होती. शिक्षण हीच समाज परिवर्तनाची खरी शक्ती आहे, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणूनच संस्थेच्या प्रत्येक शैक्षणिक उपक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, शिक्षकांच्या गुणवत्तावाढीसाठी आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले.
स्वतःचा व्यावसायिक व्याप प्रचंड मोठा असतानाही त्यांनी संस्थेच्या कामाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. अनेकदा दिवसेंदिवस संस्थेचे हिशेब, नियोजन, प्रशासकीय कामकाज आणि विविध उपक्रमांची जबाबदारी ते स्वतः सांभाळत असत. संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेला वेळ, श्रम आणि समर्पण आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. संस्थेच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांची दूरदृष्टी, व्यवस्थापन कौशल्य आणि सकारात्मक विचार प्रकर्षाने जाणवत असे.
कोणताही संस्थेचा कार्यक्रम असो, सुधाभाई वेळेच्या आधी उपस्थित असत. वक्तशीरपणा, शिस्त आणि कार्यनिष्ठा हे त्यांचे प्रमुख गुण होते. त्यांनी आपल्या कृतीतून वेळेचे महत्त्व सर्वांना शिकवले. संस्थेच्या प्रगतीसाठी दिवसाची रात्र करून काम करताना त्यांना अनेक वेळा जवळून पाहण्याचा योग मला आला. संस्थेबद्दलची त्यांची तळमळ, प्रेम आणि समर्पण पाहून प्रत्येकाला प्रेरणा मिळत असे.
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी ही त्यांच्यासाठी केवळ एक संस्था नव्हती, तर ते तिचे कुटुंब मानत होते. संस्थेच्या यशात त्यांचा आनंद होता आणि अडचणींमध्ये त्यांची चिंता असायची. संस्थेच्या प्रत्येक घटकाबद्दल त्यांना अपार प्रेम होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी मॉडर्नच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन हे शिक्षणसेवा, समाजसेवा आणि माणुसकीच्या मूल्यांचे जिवंत उदाहरण ठरले.
आज सुधाभाई आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी, त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांनी जपलेली माणुसकी कायम आपल्या सोबत राहणार आहे. त्यांनी दाखवलेला मार्ग पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
अशा या शिक्षणवेड्या, कर्मयोगी, दानशूर आणि माणुसकी जपणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वास माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
“माणूस जातो, पण त्याचे कार्य आणि संस्कार अमर राहतात. सुधाभाई, आपण आमच्यात नसाल; परंतु आपल्या कार्याचा सुगंध आणि आठवणी कायम आमच्या हृदयात जिवंत राहतील.”
आदरणीय सुधा भाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐
– महेश खिलारे