

दर्पण न्यूज पलूस : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ सहज व अल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठी बांबवडे येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) कदम यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात हा उपक्रम बुधवारी पार पडला.
या शिबिरामध्ये आधार कार्ड अपडेट, नवीन आधार नोंदणी, मोबाईल क्रमांक लिंक करणे, बायोमेट्रिक अपडेट, एनसीएमसी (स्मार्ट कार्ड) काढणे तसेच पीएम किसान योजनेची ई-केवायसी अशा विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. विशेष म्हणजे या सर्व सेवा नागरिकांना त्यांच्या गावातच शासकीय नियमांनुसार आणि अत्यंत अल्प दरात उपलब्ध झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय वाचली.
ग्रामीण भागातील नागरिकांना अनेकदा अशा कामांसाठी तालुका किंवा जिल्हा मुख्यालयात जावे लागते. त्यासाठी वेळ, पैसा आणि श्रम खर्च होतात. मात्र या शिबिरामुळे सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी वर्गासाठी हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरला.
एनसीएमसी स्मार्ट कार्डमुळे एसटी प्रवासातील विविध सवलतींचा लाभ मिळणार असून, पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांना शासकीय अनुदानाचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच आधार कार्डाशी संबंधित अनेक प्रलंबित कामेही या शिबिरात पूर्ण करण्यात आली.
गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करताना, “शासकीय योजनांचा लाभ थेट नागरिकांच्या दारी आणण्याचे काम प्रदीप (आप्पा) कदम यांनी केले असून ही खरी जनसेवा आहे,” अशा भावना व्यक्त केल्या. भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबवून अधिकाधिक नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश सफल झाला असून बांबवडे परिसरात या जनहिताच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. याप्रसंगी भास्कर संकपाळ,सागर कदम,संतोष कदम,विकास कदम,राहुल पाटील,राजेश पवार,तोफिक मुल्ला यांनी विशेष प्रयत्न केले.