– पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शुभेच्छा संदेश
– जिल्हाभरात 682 अधिकारी, 288 लोकप्रतिनिधींनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत
– पहिल्या दिवशी जिल्हाभरात 16 हजार 647 मुले शाळेत दाखल
दर्पण न्यूज मिरज/सांगली – : सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील शाळांच्या प्रांगणात ज्ञान, आनंद आणि उत्साहाचा जल्लोष अनुभवायला मिळाला.
पहिल्या दिवशी जिल्हाभरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. नवागत मुलांना पारंपरिक वेशभूषेत, तसेच टोप्या व फेटे घालून रथ, ट्रॅक्टर, घोडागाडी , बैलगाडी व थार इ. वाहनांना सजवून त्यातून ढोल ताशा, लेझीम इ. माध्यमाने वाजत-गाजत मिरवणुकीने पावलांचे ठसे उमटवून शाळेत आणण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संदेश पत्राव्दारे शाळा प्रवेशोत्सवानिमित्त सर्व नवागत मुलांना उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी तसेच सर्व शिक्षकांनाही शुभेच्छा दिल्या. पहिल्या दिवशी जिल्हाभरात 16 हजार 647 मुले शाळेत दाखल झाली. त्यापैकी 12 हजार 657 मुले जिल्हा परिषद शाळात तर इतर शाळांत 3 हजार 992 मुले दाखल झाली.
जिल्हाभरात 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येत असून, यासाठी दि. 15 जून, ते 30 जून, 2026 या कालावधीत जिल्हयात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रभावीपणे साजरा करण्यात येत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरात लोकप्रतिनिधी, विविध जिल्हा आणि तालुका स्तरीय अधिकारी यांनी विविध ठिकाणी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा हुरूप वाढवला. या मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, फुले देऊन स्वागत करण्यात आले. मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश, पायमोजे व शूज वाटप करण्यात आले. तसेच, गोड खाऊ वाटप करण्यात आला. शाळांमध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शालेय परिसर स्वच्छ करून, सडा-रांगोळी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज होत्या. शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणूनही साजरा करण्यात आला.
मान्यवरांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांत उत्साह
खासदार विशाल पाटील यांनी महानगरपालिका शाळा क्रमांक 14 सांगली येथे, आमदार अरूण लाड यांनी जिल्हा परिषद शाळा साठेनगर, ता. पलूस येथे, आमदार इद्रिस नायकवडी यांनी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2, म्हैसाळ ता. मिरज येथे, आमदार सुरेश खाडे यांनी जिल्हा परिषद शाळा बिरोबामाळ, ता. मिरज येथे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 01 जत, ता. जत येथे, आमदार सुहास बाबर यांनी जिल्हा परिषद शाळा लेंगरे, ता.खानापूर येथे, आमदार रोहित पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2, सावळज ता. तासगांव येथे, उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
जिल्हाधिकारी रमले बामणोलीच्या शाळेत
जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी जिल्हा परिषद शाळा, बामणोली येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच, सर्व मुलांना खुप शुभेच्छा दिल्या. तसेच, निवासी जिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांनी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1, मालगांव, ता. मिरज येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय, पुणेचे संचालक महेश पालकर यांनी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2 नेर्ले (ता. वाळवा) येथे भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी sqaaf प्रमुख व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, पुणेचे सहसंचालक प्रदीप कुडाळकर , शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे उपस्थित होते. कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी जिल्हा परिषद शाळा तांदुळवाडी व पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय, तांदुळवाडी (ता. वाळवा) जि सांगली येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
जिल्हास्तरावरून महसूल विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या कार्यालयामधील वर्ग 1 व वर्ग 2 च्या एकूण 94 अधिकाऱ्यांनी तसेच तालुकास्तरावरील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच सर्व शासकीय कार्यालयामधील एकूण 588 अशा एकूण 682 अधिकाऱ्यांनी तसेच जिल्ह्यातील एकूण 277 लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण 1352 शाळांना भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
जिल्हा परिषद पदाधिकारी यांनीही केले स्वागत
जिल्हा परिषद, उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समिती सभापती ऋषिकेश लाड यांनी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2, कुंडल ता. पलूस व जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2, कर्नाळ ता. मिरज येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. समाजकल्याण सभापती दादासाहेब कोळेकर यांनी जिल्हा परिषद शाळा नांगोळे, ता. कवठेमहांकाळ येथे, कृषी व पशूसंवर्धन सभापती सावित्री तमन्नगोंडा रविपाटील यांनी जिल्हा परिषद शाळा जाडरबोबलाद, ता. जत येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी जिल्हा परिषद शाळा कवठेएकंद येथे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), मोहन गायकवाड यांनी जिल्हा परिषद शाळा, सिध्देवाडी व अजितराव घोरपडे विद्यालय, कळंबी येथे तर शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोंत्रे यांनी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1, आटपाडी येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांबरोबरच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक गट, अंगणवाडी ताई/ सेविका, आशा वर्कर तसेच स्थानिक शैक्षणिक व सामाजिक संस्था, सहकारी संस्था, स्थानिक सेवाभावी संस्था, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनीही शाळा प्रवेशोत्सव उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमांतर्गत सर्व तालुक्याकडून दररोज शाळेत दाखल होणाऱ्या मुलांची माहिती जिल्हास्तरावर संकलित केली जाणार असून, 100 टक्के पटनोंदणी करणेच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले.