
दर्पण न्यूज पलूस भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील कुंडल व बुरुंगवाडी येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांवर जातीवाचक वक्तव्य केल्याचा तसेच भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचा दावा करत त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवक आघाडी, पलूस तालुक्याच्या वतीने करण्यात आली. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व आरपीआय (आठवले गट) युवक आघाडीचे पलूस तालुका अध्यक्ष अविनाश काळीबाग यांनी केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी “भ्रष्टाचारी व जातीवाचक ग्रामविकास अधिकारी तात्काळ निलंबित झालेच पाहिजेत” अशा घोषणा देत,बोंब ठोकून प्रशासनाचे लक्ष वेधले.
आंदोलनकर्त्यांनी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जातीवाचक वक्तव्ये व भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी सुरू करावी व संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करावे, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.दरम्यान गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी या दोन्ही ग्रामसेवक अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करून, योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक आघाडी पलूस तालुका अध्यक्ष अविनाश काळीबाग यांनी दिली.
यावेळी आर पी आय आठवले गट पलूस तालुका कार्याध्यक्ष अमरजीत राजवंत,कमलेश सावंत, सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ कांबळे, अविनाश होवाळ, रणजीत सावंत, सनी सावंत, बबन सोळवंडे, लखन बनसोडे, अस्मिता बनसोडे, रमेश सोळवंडे, योगेश दोडके, ओंकार कांबळे, जीवन हांडे, गणेश कांबळे तसेच आर पी आय युवक आघाडी उपाध्यक्ष यश ऐवळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.