दर्पण न्यूज पलूस भिलवडी : प्रेमविवाहाचा राग मनात धरून एका तरुणाच्या वडिलांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना भिलवडी रेल्वे स्टेशन परिसरात घडली. या हल्लूयात यशवंत गोविंद शिंदे (वय ४७, रा. शिंदे मळा, खंडोबाचीवाडी, ता. पलूस) हे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी भिलवडी पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १२
जून) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास यशवंत शिंदे हे भिलवडी रेल्वे स्टेशनजवळील मारुती मंदिर परिसरात गेले होते. त्यावेळी तेथे थांबलेल्या शैलेश यशवंत यादव (रा. हजारवाडी, ता. पलूस) याने त्यांच्यावर अचानक कोयत्याने हल्लाकेला. यशवंत शिंदे यांचा मुलगा वेदांत शिंदे याने शैलेश यादव यांच्या भाचीसोबत प्रेमविवाह केला होता. या कारणाचा राग मनात धरून आरोपीने यशवंत शिंदे यांच्या डाव्या हातावर कोयत्याने जोरदार वार केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या पाठीवरही वार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या घटनेनंतर जखमी यशवंत शिंदे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, वेदांतयशवंत शिंदे (वय २२) यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शैलेश यादव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ११८ (२), शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश गस्ते करीत आहेत.