दर्पण न्यूज पलूस/भिलवडी :-
ज्या गावात समृद्ध वाचनालय आहे तेथील समाज प्रगल्भ होतो असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
येथील सार्वजनिक वाचनालयात प्रा. जोशी यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी वाचनालयास ४ लाख रुपयांची पुस्तके भेट दिली. या ग्रंथ भेटीबद्दल त्यांचा वाचनालयाच्यावतीने अध्यक्ष गिरीश चितळे यांनी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन सत्कार केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक नवनाथ गोरे यांची विशेष उपस्थिती होती.
प्रा. जोशी म्हणाले, माझा आणि या वाचनालयाचा दोन दशकांचा स्नेह आहे. येथे वाचकांचा महापूर येतो. आपुलकीचा सरोवर आहे. या वाचनसंस्कृतीचा खरंतर महाराष्ट्राने आदर्श घ्यायला पाहिजे. वाचलेलं आपणास पचवता आलं पाहिजे. हे वाचनालय म्हणजे एक सांस्कृतिक वैभव आहे. उपक्रमशील वाचकांसाठी स्वागतशील आहे. वाचन प्रसार घडला पाहिजे. वाचनसंस्कृतीला सध्या मरगळ आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मी अखेरपर्यंत ग्रंथसंपदा देणार असल्याचे घोषित केले.
गिरीश चितळे म्हणाले,
या ग्रंथसंपदांमुळे नववाचकांची दृष्टी नक्कीच बदलेल. पुस्तके वाचल्याने जीवन समृद्ध होते. प्रत्येकाने वाचन चळवळ टिकण्यासाठी कार्य करावे.
यावेळी प्रा. मिलिंद जोशी यांनी भेट दिलेल्या पुस्तकांचे छोटेखानी प्रदर्शनही भरवण्यात आले होते. वाचनालय खऱ्या अर्थाने समृद्ध झाल्याची भावना वाचकांनी व्यक्त केली. भिलवडी आणि परिसरातून प्रा. मिलिंद जोशी यांचे कौतुक होत आहे. स्वागत वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष डी. आर. कदम, ग्रंथपाल मयुरी नलवडे, विद्या निकम, वाचनालयाचे विश्वस्त, संचालक मंडळ आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.