
दर्पण न्यूज भिलवडी पलूस प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक भवितव्याची योग्य दिशा मिळावी या उद्देशाने प्रदीप (आप्पा) कदम यांच्या संकल्पनेतून “विद्यार्थी करिअर मार्गदर्शन सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. हा मार्गदर्शन कार्यक्रम रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री मंगल कार्यालय, पलूस येथे होणार आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोकप्रिय करिअर काउंसलर व यशस्वी प्लेसमेंट ऑफिसर प्रा. तोहिद मुजावर (एम.टेक सिव्हिल) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शालेय शिक्षणातील प्रगती, दहावी-बारावीनंतरच्या करिअरच्या विविध संधी, शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक क्षेत्रातील नवीन दिशा, सरकारी व खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी, तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील बदल आणि करिअर नियोजन याबाबत ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
प्रा. मुजावर हे सेंटर फॉर करिअर काउंसिलिंग अँड प्लेसमेंट्स, इंडियाचे संचालक असून महाराष्ट्र राज्य ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असोसिएशनचे संस्थापक उपाध्यक्ष आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह करिअर निवडीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर ते मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव घोंडीराम शिंदे हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून पी व्ही पी आय टी सांगली येथील प्रा. रोहित पाटील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) कदम यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या करिअर मार्गदर्शन सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.