
दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक परिसरात कॅन्टीनमधून निर्माण होणारे घाण सांडपाणी उघडपणे बस स्थानकाच्या आवारात सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच बस स्थानक परिसरातील विविध व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक हे जिल्ह्यातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक केंद्र असून दररोज हजारो प्रवासी येथे ये-जा करतात. अशा ठिकाणी स्वच्छता व आरोग्यविषयक बाबींना सर्वोच्च प्राधान्य असणे अपेक्षित असताना कॅन्टीनच्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने परिसरात अस्वच्छता वाढली आहे. साचलेल्या घाण पाण्यामुळे डास, माश्या व विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला असून प्रवाशांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात मा. पालकमंत्री, मा. जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, विभाग नियंत्रक व डेपो व्यवस्थापक यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कॅन्टीनमधून सोडले जाणारे घाण सांडपाणी त्वरित बंद करावे, सांडपाण्याची कायमस्वरूपी व शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी तसेच या प्रकरणासाठी जबाबदार असलेल्या कॅन्टीन चालक, डेपो व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाचे मोबाईल शूटिंग (व्हिडिओ पुरावा) व छायाचित्रे उपलब्ध असून आवश्यकतेनुसार प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहेत. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.