दर्पण न्यूज पलूस :- ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, माजी राज्यपाल तथा डी. वाय. पाटील समूहाचे संस्थापक मा. डॉ. डी. वाय. (दादा) पाटील यांच्या दुःखद निधनाने शिक्षण, समाजसेवा, सहकार आणि सार्वजनिक जीवनातील एक दूरदर्शी, लोकाभिमुख व प्रेरणादायी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक व लोकनेते मा. जे. के. (बापू) जाधव यांच्याशी सन २००० पासून दादांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आत्मीय संबंध होते. त्यांनी मानसिंग को-ऑप. बँकेच्या सांगली व पलूस शाखांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच त्यांच्या शुभहस्ते मानसिंग को-ऑप. बँक, विटा शाखेचे उद्घाटन संपन्न झाले होते. या ऐतिहासिक सोहळ्यास माजी मंत्री स्व. डॉ. पतंगरावजी कदम, स्व. भय्यू महाराज तसेच आमदार डॉ. विश्वजीत (बाळासाहेब) कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
सन २००२–०३ मध्ये कृष्णाकाठ शेतीमाल प्रक्रिया व साठवणूक सहकारी संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी देखील दादा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या कार्यक्रमास तत्कालीन पणन मंत्री मा. हर्षवर्धन पाटील व स्व. डॉ. पतंगरावजी कदम यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली होती.
दादांचे जाधव परिवाराशी असलेले नाते हे केवळ औपचारिक नव्हते, तर ते स्नेह, विश्वास आणि समाजसेवेच्या समान ध्येयातून निर्माण झालेले होते. त्यांच्या उदार सामाजिक बांधिलकीतून मीनाक्षीदेवी जाधव ज्ञानप्रबोधिनी चॅरिटेबल ट्रस्टला त्यांनी रुग्णवाहिका भेट देऊन समाजाप्रती असलेली संवेदनशीलता कृतीतून सिद्ध केली.
दादांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रकाश समाजाला कायम प्रेरणा देत राहील. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली…!
“काही व्यक्ती काळाच्या पुढे जाऊन कार्य करतात; त्यांचे शरीर नश्वर असले तरी त्यांचे विचार, संस्कार आणि कार्य समाजाच्या स्मरणात सदैव अमर राहतात.”
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना व असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
कृष्णाकाठ उद्योग समूह
मानसिंग को-ऑप. बँक लि.
यांच्या वतीने विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली.
