दर्पण न्यूज विटा खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त रविवार दिनांक ३१ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित हे व्याख्यान होणार असून साहित्य, समाजकारण आणि आदर्श प्रशासन या विषयांवरही ते मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे
साहित्यिक रघुराज मेटकरी हे ग्रामीण भागातील साहित्य चळवळीचे एक महत्त्वाचे नाव मानले जाते. त्यांच्या अनेक साहित्यकृती प्रकाशित झालेल्या असून ग्रामीण संस्कृती, सामाजिक जाणीवा आणि मराठी साहित्य संवर्धनासाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे. विटा येथे गेली तब्बल ४४ वर्षे ते ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे सातत्याने आयोजन करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण साहित्याला नवी दिशा मिळाल्याचे मानले जाते.
तसेच विटा येथील सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशाला या शैक्षणिक संस्थेचे ते संस्थापक असून शिक्षण क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. साहित्य, शिक्षण आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची दखल घेत विद्यापीठाने त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करून विशेष गौरव केला आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त आयोजित या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना व साहित्यप्रेमींना इतिहास, संस्कृती आणि प्रेरणादायी नेतृत्व यांचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. साहित्यिक वर्तुळातून या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला जात असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.