दर्पण न्यूज मिरज/सांगली : कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक करून दाखवून, त्याबाबत सहाय्यक कृषि अधिकारी अमित सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांना अधिक मार्गदर्शन केले. जुना पद्माळे रोड, सांगली येथे प्रदीप रामगोंडा पाटील यांच्या मळ्यात झालेल्या या प्रात्यक्षिकावेळी उपकृषि अधिकारी प्रदीप माळी, सहाय्यक कृषि अधिकारी दिलीप मिरेकर उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक कृषि अधिकारी अमित सूर्यवंशी म्हणाले, जे शेतकरी सोयाबीन किंवा भुईमुग करणार असतील, अशा सर्व शेतकऱ्यांनी प्रथमतः त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच बियाण्याची पेरणी करावी. यामध्ये शेतकऱ्यांनी प्रथमतः एक सुती गोणपाट घेऊन ते पाण्याने ओले करावे. त्यावर 100 बिया ठेवाव्यात. नंतर ते गोणपाट गुंडाळी करून त्याला दोन्ही बाजूंनी दोरीने बांधून त्यावरती 5 ते 6 दिवस पाणी मारावे. त्यानंतर बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करावी. त्यामध्ये जर 70 बियाण्याला कोंब आले असेल तर ते बियाणे पेरणीयोग्य आहे असे समजावे. यावेळी शेतकऱ्यांना सहजपणे समजावे याकरिता बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक डेमो ही दाखविण्याकरिता आणण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी शेतकरी प्रदीप पाटील, शिवाजी चौगुले, जयवंत पाटील, प्रमोद पाटील, अंजुम महात, प्रकाश पाटील, दिलीप बोळाज व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.