
दर्पण न्यूज पलूस/ भिलवडी -: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले आणि चोरीस गेलेल्या मोबाईल शोध मोहिमेत यश मिळाले आहे. यामध्ये ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे २२ मोबाईल हँडसेट हस्तगत केले आहेत. तांत्रिक तपासाच्या आधारे हे मोबाईल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह परराज्यातून शोधून काढण्यात आले. ते संबंधित मालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. लोकांमध्ये समाधान व्यक्त केले, अशी माहिती भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी दिली.
भिलवडी पोलिस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणी तसेच आठवडी बाजार परिसरात नागरिकांचे मोबाईल हरवणे अथवा चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या. याबाबत नोंदी झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
या कारवाईत पोलिसांनी विविध ठिकाणांहून २२ मोबाईल हस्तगत केले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ५ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे, पोलिस उपनिरीक्षक रोहिदास पावशे, पोलिस शिपाई धीरज खुडे, संतोष जाधव, सतपाल सावंत, गणेश शिंदे व अजित लिंबळे यांनी सहभाग घेतला होता.
भिलवडी पोलिस ठाण्याने ही धडाकेबाज कामगिरी केल्याबद्दल भिलवडी आणि परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.