दर्पण न्यूज विटा (सिराज शिकलगार):- आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, विटा या महाविद्यालयला तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रथम वर्ष तसेच थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी अधिकृत सुविधा केंद्र म्हणून मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे विटा व परिसरातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाने डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले असून, दि. २० मे २०२६ पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. प्रवेश अर्ज भरणे व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुविधा केंद्रात सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करणे, अर्ज निश्चित (कन्फर्म) करणे आदी सर्व प्रक्रिया सुलभपणे पूर्ण करता येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरामध्ये जाण्याची गरज भासणार नसून वेळ आणि खर्चाची मोठी बचत होणार आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी अर्ज शासन शुल्क ४०० रुपये तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या सुविधा केंद्रामुळे विटा परिसरातील विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन संचालिका पूजा पाटील ,प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, , रजिस्ट्रार अजित चव्हाण प्रवेश विभाग प्रमुख प्रदीप शिंदे तसेच सुविधा केंद्रप्रमुख श्री. सिद्धनाथ शिंदे यांनी केले आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, विटा येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेकडून संस्थेचे कार्यकारी संचालक श्री पी टी पाटील व अध्यक्ष श्री वैभव दादा पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे..