

दर्पण न्यूज मिरज/सांगली :- हिंदू देवस्थानांचे स्वायत्त , अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत धोक्यात आणणारा ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ कायदा रहित करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, या मागणीचे हिंदु एकता आंदोलन,मिरज संस्थान आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन सांगलीच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.स्नेहल कनिचे यांना देण्यात आले.हिंदु एकता आंदोलन आणि मंदिर महासंघाची मागणी योग्य असून या संदर्भात शासनाकडे भूमिका मांडू,असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यासाठी हिंदु एकता आंदोलनच्या वतीने माजी आमदार नितीन राजे शिंदे,मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, दत्तात्रय भोकरे, जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव ,अवधूत जाधव,सचिन भोसले,विजयसिंह राजपूत,श्री ज्ञानगिरी मठाचे शिवप्रसाद सातपुते, उद्योजक दिगंबर कोरे, मिरज येथील श्री वीरभद्र मंदिराचे विश्वस्त अशोक कबाडे, गोकुळनंदन गोशाळेचे नितेश जाधव,गोपाळकृष्ण गवळी समाजाच्या श्रीकृष्ण मंदिराचे मनोज गवळी, राजू गवळी, हिंदु जनजागृती समितीचे संतोष देसाई मंदिर महासंघाचे संजय घाटगे, गोंधळी समाजाचे नितीन भोरावत, अधिवक्ता सुमेध ठाणेदार यांच्यासह अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते.
“हिंदु देवस्थानांवर अन्याय करणाऱ्या ह्या प्रस्तावित कायद्याला सांगली जिल्ह्यातील हिंदू मतदारांनी निवडून दिलेल्या हिंदु आमदारांनी येत्या पावसाळी अधिवेशनात कडाडून विरोध करावा.हिंदु एकता आंदोलनाच्या माध्यमातून हा कायदा आम्ही रहित करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू” अशी चेतावणी यावेळी हिंदु एकता आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली. ईश्वरपूर आणि तासगांव येथील तहसीलदार कार्यालयात मंदिर महासंघाच्या वतीने अशाच मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.