

*”आप्पांबाबत लवकरच मिळणार राजकीय आनंदाची बातमी” – डॉ. प्रतापनाना पाटलांच्या विधानाने कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह*
दर्पण न्यूज पलूस:- छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून, स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) कदम यांनी आयोजित केलेल्या ‘यशवंत फेस्टिव्हल पलूस २०२६’ चे दिमाखदार उद्घाटन गुरुवारी पार पडले. पलूस-कडेगावचे प्रांताधिकारी रणजीत भोसले यांच्या हस्ते फित कापून महोत्सवाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची भव्य आतषबाजी आणि पलूसकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापनाना पाटील होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे वाळवा तालुकाध्यक्ष केदारदादा पाटील, व्हि. वाय. आबा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रांताधिकारी रणजीत भोसले
उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रांताधिकारी रणजीत भोसले म्हणाले की, “प्रदीप आप्पा कदम यांनी पलूस आणि आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांसाठी शहराच्या धर्तीवर ‘यशवंत फेस्टिव्हल’ उपलब्ध करून दिला आहे. हे केवळ मनोरंजन नसून एक आकर्षणाचे केंद्र आहे, याचा लाभ सर्व नागरिकांनी सहकुटुंब घ्यावा.”
महोत्सवाचे आयोजक प्रदीप (आप्पा) कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मोठ्या शहरांमध्ये होणारे फेस्टिव्हल्स ग्रामीण जनतेला पाहणे शक्य नसते. म्हणूनच पलूसकरांना ही संधी घरबसल्या मिळावी, या उद्देशाने आम्ही या महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव म्हणजे खरेदी, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी पर्वणी आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रतापनाना पाटील यांनी भाषणादरम्यान एक मोठे विधान केले. ते म्हणाले, “प्रदीप आप्पांसारखा लढवय्या कार्यकर्ता आम्हाला हवा आहे. त्यांच्या माध्यमातून या भागाला एक नवे आणि खंबीर नेतृत्व मिळाले आहे. लवकरच त्यांच्याबाबत एक मोठी राजकीय आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.” डॉ. प्रतापनानांच्या या विधानाने महोत्सवाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला आणि परिसरात या विधानाची मोठी चर्चा रंगली आहे.
यशवंत फेस्टिव्हलमध्ये पहिल्याच दिवशी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. फनफेअरमधील आकाश पाळणा, टोराटोरा, ड्रॅगन ट्रेन आणि नावडीचा आनंद घेण्यासाठी लहान मुले व तरुणाईने मोठी रांग लावली होती. रात्री झालेल्या ‘सर्किट नाना’ या धमाकेदार मनोरंजनाच्या कार्यक्रमाने पलूसकरांना खिळवून ठेवले.
१४ मे: सर्किट नाना लाईव्ह शो
१५ मे: ४५ महिला कलाकारांचे ऐतिहासिक दोन अंकी नाटक ‘शिवप्रताप’.
१६ मे: लोककला अविष्कार ‘गर्जा महाराष्ट्र माझा’.
१७ मे: श्वेता दांडेकर व शुभम सातपुते यांचा लाईव्ह गायन-नृत्य शो.
१८ मे: भव्य रेकॉर्डिंग डान्स स्पर्धा.
या सोहळ्याला स्वागत व प्रास्ताविक अभिजीत सावंत यांनी केले, तर सूत्रसंचालन अंकुश राजमाने यांनी केले. आभार अमीर भैया पठाण यांनी मानले. यावेळी संजयकुमार शिंदे, रणजीत शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजीत कौलगे, राजेंद्र कुंभार, सुनील पोळ, उल्हास पाटील, धोंडीराम शिंदे, पै. संभाजी पाटील, मारूती शिरतोडे, चंद्रकांत गोंदील, आकाराम पाटील, सुभाष पाटील, कृष्णा मिठारी, सुग्रीव बुचडे, मोहीतेवडगांवचे माजी सरपंच विजय मोहिते, राजेंद्र मोहिते यांसह तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



