

दर्पण न्यूज पलूस भिलवडी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून नागठाणे येथे आयोजित करण्यात आलेले व्याख्यान अत्यंत प्रेरणादायी वातावरणात आणि जनसमुदायाच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे प्रदीप आप्पा कदम अध्यक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती हे उपस्थित होते.’भीम गर्जना युवक मित्र मंडळ, नागठाणे’ व ‘बौद्ध नागरी समिती, नागठाणे व मुंबई’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याने परिसरात वैचारिक प्रबोधनाची नवी लाट निर्माण केली आहे.
“ज्या बाबासाहेबांनी देशाला भारतीय राज्यघटना दिली, त्या संविधानामुळेच अनेक जाती, धर्म आणि प्रांत असलेला आपला भारत देश आज एकसंध आहे. स्वातंत्र्याच्या १०० वर्षांकडे वाटचाल करत असताना, लोकशाही आणि कायद्याचे राज्य टिकवण्यासाठी बाबासाहेबांचे विचार पुन्हा एकदा सखोलपणे समजून घेण्याची गरज आहे,” असे परखड प्रतिपादन व्याख्याते मा. श्री. सुदर्शन शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ‘स्वराज्य ते संविधान’ हा प्रेरणादायी संदेश देणारा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. “नागठाणे येथील युवकांनी सामाजिक ऐक्य जपून हा जो स्तुत्य उपक्रम राबवला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.संविधानावर आधारित असलेली आपली लोकशाही हीच देशाची खरी ताकद आहे”. असे मत प्रदीप आप्पा कदम यांनी यावेळी बोलताना मांडले.तसेच त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिला, भगिनी आणि मातांच्या मोठ्या संख्येबद्दल समाधान व्यक्त करत, प्रबोधनाच्या या कार्यात महिलांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय व्याख्याते मा. सुदर्शन (दादा) शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. “बाबासाहेबांचे विचार केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवजातीला दिशा देणारे आहेत,” असे प्रतिपादन त्यांनी आपल्या ओघवत्या आणि धारदार शैलीत केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
यावेळी मराठा सेवा संघाचे प्रताप पाटील सर, तुकाराम धायगुडे,यशवंत कदम, वैभव यादव,अभिजीत कदम, दौलत पाटील,आशिष सूर्यवंशी, अमीर पठाण, तुषार सूर्यवंशी मान्यवर उपस्थित होते.
नागठाणे ग्रामपंचायतीसमोरील प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्याला अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपाचे होते. ‘समस्त ग्रामस्थ, नागठाणे’ यांच्या सक्रिय सहकार्यामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने दिमाखदार आणि यशस्वी ठरला.
यावेळी ऋषिकेश बनसोडे, भुषण कांबळे, ऋतिक बनसोडे, साहिल बनसोडे, पीयुष कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व पाहुण्यांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले. या सोहळ्यामुळे नागठाणे परिसरात एक सकारात्मक आणि प्रबोधनात्मक वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमाचे स्वागत पै.प्रतिक कांबळे यांनी तर सुत्रसंचालन शहाजी कापसे यांनी केले.यावेळी पंचायत समिती सभापती जगन्नाथ मोटे,सरपंच सागर पाटील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.