दर्पण न्यूज भिलवडी : जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडी यांच्या माध्यमातून २१५ वे नेत्रदान यशस्वीरीत्या पार पडले. भिलवडी येथील स्वर्गीय श्रीमती पुष्पावती आण्णासो चोपडे यांच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे दोन गरजू व्यक्तींना दृष्टीदानाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
या नेत्रदानाबद्दलचे प्रमाणपत्र जायन्ट्सचे NCF मेंबर तथा उद्योजक श्री. मकरंद चितळे यांच्या हस्ते चोपडे कुटुंबीयांना प्रदान करण्यात आले. यावेळी जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडीचे अध्यक्ष बाहुबली चौगुले, सुबोध वाळवेकर, महावीर चौगुले, विशाल सावळवाडे, संभाजी महिंद तसेच जायन्ट्सचे सभासद उपस्थित होते.
नेत्रदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ. सुनिल वाळवेकर, डॉ. जयकुमार चोपडे आणि डॉ. महावीर चोपडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सांगली येथील नंदादीप आय बँकेचे डॉ. पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रसंकलनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
समाजात नेत्रदानाविषयी जनजागृती करून अधिकाधिक नागरिकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडीच्या वतीने अध्यक्ष बाहुबली चौगुले यांनी केले.
