दर्पण न्यूज धाराशिव (संतोष खुने ) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.या सप्ताहाच्या निमित्ताने शासकीयस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाचे आज ८ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त बलभीम शिंदे,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे,समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले, समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने,इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अमोल ताकभाते यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की,महापुरुषांच्या विचारांची बांधिलकी जपणे व पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यांनी भारतीय संविधान निर्मितीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान आणि मूलभूत हक्कांविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच डॉ.आंबेडकर यांनी केलेल्या विविध चळवळी व सत्याग्रहांची माहिती देत सामाजिक समता सप्ताहाचे महत्त्व पटवून दिले.
या सामाजिक समता सप्ताहामध्ये ‘स्वाधार योजना व इतर शासकीय योजनांचे लाभ’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व मार्गदर्शन दिले जाणार आहे.तसेच स्वच्छता अभियान राबवून समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.यासोबतच रक्तदान शिबिर,जयंती उत्सव,विविध स्पर्धा, सामाजिक समता रथाद्वारे प्रबोधन आणि विविध विषयांवरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती.प्रियंवदा महाडदळकर यांनीही सामाजिक समता सप्ताहानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी आकांक्षा कोकाटे,दीक्षा भालशंकर,मोनिका गवळी व वैष्णवी माने या विद्यार्थिनींना जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.