दर्पण न्यूज मिरज /सांगली: -राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दि. 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताह कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
सप्ताहाची सुरूवात दिनांक 8 एप्रिल, 2026 रोजी होणार असून या दिवशी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारा चित्ररथ सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात फिरवण्यात येणार आहे. तसेच, दुपारी प्रसारमाध्यमांना या सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे.
दि. 9 एप्रिल 2026 रोजी अंधश्रध्दा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत प्रबोधनपर कार्यशाळा वसंतदादा पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड रिसर्च सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे. दि. 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांगली येथे मनी मार्जिन कार्यशाळा आणि सायंकाळी 5 वाजता हरिपूर ग्रामपंचायत सभागृहामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 11 एप्रिल 2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणे व शासकीय वसतिगृहांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 12 एप्रिल 2026 रोजी शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृहांमध्ये संविधान जागर व संविधान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 13 एप्रिल 2026 रोजी विजयनगर येथे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि. 14 एप्रिल 2026 रोजी सामाजिक न्याय विभागांतर्गत अधिनस्त सर्व शासकीय कार्यालये, महाविद्यालये, येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी करणे व दीपस्तंभ सांस्कृतिक संघ सांगली येथे अनुषंगिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून याद्वारे सामाजिक समता सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी दि. 8 ते दि. 14 एप्रिल, 2026 या कालावधीत “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” अंतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली या कार्यालयाकडून राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.