
दर्पण न्यूज पलूस :- मोहिते वडगाव येथील भैरवनाथ व्हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आणि स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष माननीय प्रदीप (आप्पा) कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘यशवंत व्हॉलीबॉल चषक २०२६’ या भव्य राज्यस्तरीय निमंत्रित व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार येत्या ४ आणि ५ एप्रिल रोजी रंगणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून नामांकित संघ दाखल होणार असल्याने, कडेगाव तालुक्यात क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे राज्यातील अव्वल दर्जाचे संघ यामध्ये आपले नशीब आजमावणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोलापूर पोलीस आणि सोलापूर ICS, पुणे BDDS (बॉम्ब शोधक व नाशक पथक), येडशी (धाराशिव), जेजुरी आणि डोरालेवाडी (बारामती), दानवाड (शिरोळ) आणि बिजवाडी (दहिवडी) यांसह मुंबई, कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील अनेक नामांकित संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. एकापेक्षा एक सरस संघांच्या सहभागामुळे व्हॉलीबॉलचा उच्च दर्जाचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
भैरवनाथ व्हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी आणि मोहिते वडगावचे ग्रामस्थ या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. ४ एप्रिल रोजी सकाळी भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून, ५ एप्रिल रोजी विजेत्या संघांना आकर्षक चषक आणि रोख रकमेची बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सांगली आणि सातारा जिल्ह्यातील, पश्चिम महाराष्ट्रातून जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन पलूस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी सौमेद परीट, प्रतिक परीट, हर्षल शिंदे, संजय शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजीत कौलगे, अभिजीत सावंत, रोहित परबत, अभिजीत कदम उपस्थित होते.