दर्पण न्यूज पलूस /भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील अमोल जगन्नाथ मोरे यांना राजस्थानमधील एस आर यु विद्यापीठ (SRU University, Rajasthan) यांच्याकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे भिलवडीसह संपूर्ण पलूस तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. मोरे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतून “An Experimental Study with Three Different Approaches for Heat Transfer Enhancement in Heat Sink” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. उष्मा वहन (Heat Transfer) कार्यक्षमता वाढविण्यासाठी हिट सिंकमध्ये विविध पद्धतींचा प्रयोगात्मक अभ्यास त्यांनी आपल्या संशोधनातून मांडला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात उपयुक्त ठरणारे हे संशोधन मानले जात आहे.
या संशोधनासाठी त्यांना डॉ. संजीव कुमार आणि डॉ. संदीप कोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
डॉ. मोरे सध्या पुण्यातील ऑल इंडिया शिवाजी मेमोरियल सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनासोबतच संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेली ही उल्लेखनीय कामगिरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल, त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. डॉ. मोरे यांच्या यशामुळे भिलवडी साठेनगर येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात त्याचे स्वागत केले आहे.