सांगली, मिरज मेडिकल हब करण्यासाठी आराखडा तयार करा ; जिल्हाधिकारी अशोक काकडे

दर्पण न्यूज सांगली : देश, विदेशातील नागरिक सांगली, मिरज येथे उपचारासाठी यावेत, रूग्णांना किफायतशीर व दर्जेदार आरोग्य सेवा देऊन सन 2030 पर्यंत सांगली, मिरज मेडिकल हब करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिले.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, आयएमए व विविध रूग्णालयांचे डॉक्टर, टुरिझम व्यावसायिक व हॉटेल व्यावसायिक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, रूग्णांना पुणे, मुंबई या मेट्रो सिटी सारख्या शहरात जे अत्याधुनिक उपचार, सुविधा मिळतात ते उपचार, सुविधा आपण आपल्या शहरात किफायतशीर किंमतीत दर्जेदार दिल्या तर आसपासच्या जिल्ह्यातील तसेच देश, विदेशातील लोक आपल्या शहराकडे आकर्षित होतील. चांगल्या रूग्णसेवेची व उच्च दर्जाच्या उपचाराची आपल्या शहरातील डॉक्टरांची ख्याती व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. सन 2030 पर्यंत सांगली, मिरज मेडिकल हब म्हणून कसे नावानुरूपास येईल या दृष्टीने व्हिजन डॉक्युमेंट बनवण्यासाठी उपाययोजना सूचवाव्यात. यामध्ये आवश्यक पायाभूत सुविधांचा समावेश असावा. यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन करून अवयवदानाबाबतही जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी डॉक्टर्स व अन्य मान्यवरांनी विविध उपाययोजना सूचविल्या.



