आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

धाराशिव येथे ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करा ; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

दर्जेदार रुग्णसेवेसाठी कामे वेळेत पूर्ण करा

 

 

दर्पण न्यूज मुंबई : धाराशिव येथे रुग्णांना दर्जेदार व आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. मंत्रालयात पार पडलेल्या संयुक्त आढावा बैठकीत त्यांनी या लोकहितकारी प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत व उच्च गुणवत्तेने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या रुग्णालयाचे काम रुग्णसेवेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण केले जावे. तसेच पुढील काही दिवसांत हे रुग्णालय सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्याचे नियोजन करावे.

धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना आधुनिक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने सुमारे ३६० कोटी रुपये खर्चून ५०० खाटांचे अत्याधुनिक जिल्हा रुग्णालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मंत्री सरनाईक आणि मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रकल्पाच्या आढावा बैठकीत रुग्णालयाच्या बांधकामासाठी आवश्यक निधी, तांत्रिक अडचणी आणि कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रस्तावित रुग्णालयाची मुख्य इमारत तीन मजली असून तिचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ४५ हजार चौ.मी. आहे. या प्रकल्पात कॅन्टीन, धर्मशाळा, लॉन्ड्री, मॉर्च्युरी, फार्मसी इमारत, पार्किंग व्यवस्था, गॅस मॅनिफोल्ड रूम व ऑक्सिजन प्लांट, तसेच बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनासाठी स्वतंत्र सुविधा उभारण्यात येणार आहेत. याशिवाय वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. काम अधिक सुनियोजित आणि जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी रुग्णालय इमारत व निवासस्थानांसाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले.

रुग्णालय परिसरात अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा व मलनिस्सारण व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, सौर ऊर्जा प्रणाली, पावसाचे पाणी साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग), पार्किंग आणि हरित परिसर विकासाची कामे करताना ती गुणवत्तापूर्ण पद्धतीने व पुढील दोन दशकांच्या गरजा लक्षात घेऊन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याने काम करताना गुणवत्तेला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले. या रुग्णालयाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट साध्य व्हावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!