महाराष्ट्रसामाजिक

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित तृतीयपंथीय उमेदवारांसाठी विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा उत्साहात

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून   “सांगली पॅटर्न” अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी रोजगार मेळावा

 

दर्पण न्यूज मिरज/सांगली : जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतील “सांगली पॅटर्न”अंतर्गत समाजातील आणखी एका उपेक्षित घटकाला जगण्याची उमेद मिळाली. निमित्त होतं वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित तृतीयपंथीय उमेदवारांसाठी विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचं.दररोज सामाजिक गैरसमज, टाळाटाळ आणि उपेक्षेचा सामना करणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी हा कार्यक्रम नवी सुरवात करण्यासाठी आत्मविश्वास देणारा ठरला. सांगली पॅटर्नची परंपरा पुढे नेणारा हा कार्यक्रम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने घेण्यात आला.

महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट हॉलमध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यासाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण बाळासाहेब कामत, जिल्हा उद्योग अधिकारी ता. ना. खांडेकर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख, यंग प्रोफेशनल प्रवीण बनकर, कौशल्य विकास सहायक अमोल बोळाज, तृतीयपंथीयांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी आरती पै, शांतिलाल काळे, किरण देशमुख, राजेंद्र (सुधा) पाटील, इम्तियाज हकीम आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अशोक काकडे मार्गदर्शन करताना म्हणाले, सामाजिक गैरसमजांवर अवलंबून न राहता स्वावलंबनाच्या दिशेने ठामपणे पाऊल टाका. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि परिस्थितीला सामोरे जा, या मार्गदर्शनामुळे उपस्थित उमेदवारांमध्ये आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित झाली.

सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रास्ताविकात तृतीयपंथीय समाजाने आपली ओळख आपल्या कर्तृत्वाने निर्माण करण्यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून पुढाकार घेतलेला असून सदर रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा हा त्याचा एक भाग असल्याचे सांगितले.

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या योजनांची माहिती इनुजा शेख यांनी,  उद्योग विभागाकडील योजनांची सविस्तर माहिती जिल्हा उद्योग अधिकारी ता. ना. खांडेकर यांनी, नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवर नोंदणी प्रक्रियेबाबत प्रवीण बनकर यांनी व अल्पमुदत रोजगारक्षम अभ्यासक्रम योजनेबाबत अमोल बोळाज यांनी माहिती दिली.

मेळाव्यात उपस्थित उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीच्या क्षेत्रानुसार वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध विभागांच्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया, ऑनलाईन नोंदणी, कर्ज प्रस्ताव सादरीकरण व उद्योजकतेसाठी आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

समाजाच्या कडेला उभ्या असलेल्या तृतीयपंथीय बांधवांना शिक्षण, रोजगार आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील संवेदनशील हेतू आहे. केवळ नोकरी मिळवून देणे नव्हे, तर आत्मविश्वास जागवणे आणि स्वावलंबनाचा मार्ग दाखवणे, हेच या मेळाव्याचे खरे वैशिष्ट्य ठरले.

तृतीयपंथीय उमेदवारांना शासनाच्या विविध रोजगार, स्वयंरोजगार व कर्ज योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देऊन, त्यांच्या कौशल्यांचा विकास घडवून आणणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या विशेष मार्गदर्शन मेळाव्यास जिल्ह्यातील तृतीयपंथीय बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

सूत्रसंचालन संतोष माने यांनी केले. कार्यक्रमास तृतीयपंथीयांसाठी कार्यरत संग्राम संस्था, व्हीएएमपी संस्था, मुस्कान संस्था, सीवायडीए संस्था या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मानवतेचा हात धरून समानतेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल, अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सदर उपक्रमामुळे तृतीयपंथीय उमेदवारांना शासनाच्या योजनांची प्रत्यक्ष माहिती मिळून स्वावलंबनाच्या दिशेने ठोस पाऊल उचलण्यास निश्चितच बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमातून तृतीयपंथीय उमेदवारांना त्यांच्या क्षमतांनुसार योग्य दिशा मिळावी, तसेच समाजात सन्मानाचे स्थान निर्माण व्हावे, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. “सांगली पॅटर्न” म्हणजे केवळ आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना नाही; तर सामाजिक समावेशकतेचे जिवंत उदाहरण आहे, याची जाणीव या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाली आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!