महाराष्ट्रसामाजिक

मुंबईत 27,28 फेब्रुवारीला पीएम विश्वकर्मा प्रदर्शन व व्यापार मेळावा ; सभापती रवींद्र साठे

ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी वस्तू खरेदी कराव्यात

 

दर्पण न्यूज मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांच्या वापराचे केलेले आवाहन तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या प्रसारासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत 27 आणि 28 फेब्रुवारीला छोट्या  उद्योजकांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व कारागिरांचे उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी हे प्रदर्शन असून नागरिकांनी वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत केले.

रविंद्र साठे यांनी सांगितले की, केंद्र सरकारचे  सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, यांचे कार्यालय, घाटकोपर-अंधेरी लिंक रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व) येथे होणार आहे. हे प्रदर्शन आणि मेळावा सकाळी 10 ते संध्याकाळी 8 या वेळेत सर्वांसाठी खुले  राहणार आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 8 प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कारागीर व शिल्पकारांच्या उत्पादनांच्या विपणन व ब्रँडिंगसंदर्भात जनजागृती करण्यासाठी 34 एकदिवसीय कार्यशाळाही आयोजित करण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनात 100 स्टॉलद्वारे ग्रामीण भागातील छोट्या कारागिरानी तयार केलेल्या बांबू हस्तकला, फर्निचर साहित्य, तयार कपडे, मातीची भांडी (कुंभारकाम), दागिने तसेच इतर पारंपरिक हस्तकला उत्पादने ठेवण्यात येणार आहेत. खादी म्हणजे केवळ कापड नव्हे, यामध्ये छोट्या उद्योजकांनी तयार केलेल्या विविध वस्तू आहेत. मुंबईतील नागरिक, उद्योजकांनी प्रदर्शनास भेट देऊन स्वदेशी उत्पादनांची खरेदी करून स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन रविंद्र साठे यांनी केले आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते होणार असून मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर उपस्थित राहणार असल्याची माहिती एमएसएमईचे संचालक मिलिंद बारापात्रे यांनी दिली.

पीएम विश्वकर्मा योजनेत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेत महाराष्ट्रने तिसरा क्रमांक पटकावला. आतापर्यंत 27 लाख अर्ज प्राप्त झाले. तीन लाख उमेदवारांनी नोंदणी यशस्वी केली, त्यापैकी अडीच लाख जणांना प्रमाणित करून दोन लाख उमेदवारांना 18 प्रकारातील ट्रेडनिहाय  प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती सभापती रविंद्र साठे यांनी दिली.

अधिक माहितीसाठी एमएसएमईचे उपसंचालक सुनील खुजनरे मुंबई (मो. ८३०८४०९०१९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!