महाराष्ट्रराजकीयसामाजिक

अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

दर्पण न्यूज मुंबई : लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. दादा, राजकारणात आपण घेतलेले अनेक निर्णय अचूक होते हे जनतेच्या न्यायालयाने सिद्ध केले आहे, पण तुमचा हा जगाचा निरोप घेण्याचा निर्णय मात्र चुकला आहे. तो मागे घ्या आणि परत या, अशा भावूक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना विधान परिषदेत श्रद्धांजली वाहिली.

यावेळी माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर पटने, श्रीमती निला देसाई या दिवंगत सदस्यांना देखील उपमुख्यमंत्र्यांनी श्रध्दांजली अर्पण केली.

            राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत दिवंगत अजित पवार, माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर पटने, श्रीमती निला देसाई यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मांडला त्यावेळी ते बोलत होते.

अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मी, देवेंद्रजी आणि अजितदादा म्हणजे राज्याच्या स्थैर्याचा एक भक्कम ‘ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी’ होतो. आम्ही तिघे एकत्र आलो म्हणून महाराष्ट्राची भूमिती आणि प्रगती वेगाने सुरू होती. २८ जानेवारीच्या त्या काळ्या दिवसाने आमचा हा आधार हिरावून नेला. दादा वेळ कधीच चुकवत नसत, पण त्या दिवशी नियतीने मात्र घात केला. टीव्हीवर त्या अपघाताची दृष्ये पाहिली आणि मनाचा थरकाप उडाला, अशी आठवण त्यांनी सांगितली.

अजितदादांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना श्री. शिंदे यांनी सांगितले की, प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती. फाईल हातात घेतल्यावर काही सेकंदात त्यांची नजर कागदावरून स्कॅन व्हायची आणि त्यातील चुका ते चटकन शोधायचे. साध्या वायर लटकत असल्या किंवा पायरी नीट बसवलेली नसली तरी ते अधिकाऱ्यांना झापायचे. ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम दादांच्या नावावर होता. दादा बाहेरून फणसासारखे कडक वाटत असले तरी आतून ते अत्यंत मृदू मनाचे होते. लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करताना त्यांनी अर्थकारणाचा समतोल उत्तम राखला होता.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मैत्रीतील काही किस्सेही सांगितले. हॉटेल हयात मधील बैठकीत जेव्हा मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा होती, तेव्हा अजितदादांनीच ‘एकनाथराव असतील तर आम्हाला चालेल’ असे ठामपणे सांगितले होते. तसेच, दादा मला नेहमी रात्री उशिरापर्यंत काम न करण्याचा आणि आरोग्याची काळजी घेण्याचा वडिलकीचा सल्ला द्यायचे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना धीर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आभाळाएवढे दुःख समोर असतानाही ताई खंबीरपणे उभ्या आहात. आम्ही दोन्ही भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. दादांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ‘विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही’ ही दादांची घोषणा आम्ही सत्यात उतरवू, असा निर्धार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शेवटी व्यक्त केला.

यावेळी माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर पटने, श्रीमती निला देसाई या दिवंगत सदस्यांना देखील उपमुख्यमंत्र्यांनी श्रध्दांजली अर्पण केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!