महाराष्ट्रसामाजिक

उत्सवाच्या जल्लोषानंतर स्वच्छतेचा ‘सांगली पॅटर्न’! जिल्हा प्रशासनाची सामाजिक बांधिलकी; स्वतः जिल्हाधिकारी उतरले मैदानात

 

 

       दर्पण न्यूज सांगली  : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत असताना, सांगली जिल्हा प्रशासनाने मात्र या उत्साहाला ‘सामाजिक बांधिलकीची’ जोड देत एक स्तुत्य उपक्रम राबविला. केवळ उत्सव साजरा करून न थांबता, उत्सवानंतरचा परिसर चकाचक ठेवण्याचा वस्तुपाठ जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आज सांगलीकरांना पाहायला मिळाला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात शिस्त आणि स्वच्छतेला महत्त्व दिले होते. तोच वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे. उत्सवाचे स्वरूप ‘कचरामुक्त’ असावे, हाच आमचा उद्देश असल्याचे  जिल्हाधिकारी अशोक काकडे यावेळी म्हणाले.

सांगलीतील मारुती चौक येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात जयंतीनिमित्त मोठी गर्दी आणि विविध कार्यक्रम झाले होते. अनेकदा अशा मोठ्या कार्यक्रमानंतर परिसरात अस्वच्छता पसरते, ज्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो. ही बाब लक्षात घेऊन ‘सांगली पॅटर्न’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाने तातडीने स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे खुद्द जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी स्वतः हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. “स्वच्छता ही आपली सामाजिक बांधिलकी आहे,” असा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला.

या स्वच्छता मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उपजिल्हाधिकारी सतीश कदम व विजया यादव, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी यासीन सय्यद, जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक संस्थांचे डॉ. संजय पाटील, प्रशांत भोसले यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह या मोहिमेत श्रमदान केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!