भिलवडी येथील साने गुरुजी संस्कार केंद्राचे वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वरचित ‘काव्य-लेखन’ स्पर्धा ; बालकवी सुभाष कवडे

दर्पण न्यूज पलूस /भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील साने गुरुजी संस्कार केंद्राचे वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वरचित ‘काव्य-लेखन’ स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती संस्कार केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी दिली आहे.
याबाबतीत अधिक माहिती सांगताना श्रीयुत कवडे म्हणाले, गेली २४ वर्षे शालेय विद्यार्थ्यांवर वाचन, लेखन आणि संस्कार व्हावेत या हेतूने या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. यावर्षी या स्पर्धा इयत्ता सहावी आणि सातवी व इयत्ता आठवी आणि नववी अशा दोन गटात होणार आहेत. सहावी सातवीसाठी – ‘सखा माझा निसर्ग’ आणि ‘माझी शाळा’ हे दोन विषय आहेत.
तर आठवी नववीसाठी- ‘जपुया नाती आपली’ आणि नको तो मोबाईल हे विषय आहेत .विद्यार्थ्यांनी या विषयांवर आपल्या कविता लिहून पाठवावयाच्या आहेत. सोबत मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र जोडावयाचे आहे. मार्च महिन्यात संपन्न होणाऱ्या विशेष समारंभात पहिल्या पाच विद्यार्थ्यांना प्रत्येक गटातील बक्षीसे देण्यात येणार आहेत. प्रमाणपत्र आणि सुंदर पुस्तके भेट म्हणून देण्यात येतील. संस्कार केंद्राच्या विश्वस्त श्रीमती सुनिता चितळे वहिनी यांच्याकडून प्रमाणपत्र आणि पुस्तकांची भेट देण्यात येणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता ५ मार्च २०२६ अखेर- सुभाष कवडे ,साने गुरुजी संस्कार केंद्र ,भिलवडी. तालुका -पलूस, जिल्हा- सांगली या पत्त्यावर पाठवाव्यात. या स्पर्धा सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्यासाठी आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. कविता सुवाच्य अक्षरात लिहावी. कवितेच्या शेवटी आपले नाव, शाळेचे नाव व मोबाईल नंबर लिहावा. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस समारंभाची तारीख नंतर कळविण्यात येईल.



