महाराष्ट्रसामाजिक

सांगलीत 16 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन :   कला संचालक डॉ. किशोर इंगळे

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते होणार उद्घाटन ; सात दिवस सुरू राहणार कला प्रदर्शन

         दर्पण न्यूज मिरज सांगली : दृश्य कला क्षेत्रातील विद्यार्थी व उदयोन्मुख कलाकारांना आपली कला व्यापक स्तरावर सादर करता यावी, त्यांच्या सुप्त कला गुणांना प्रोत्साहन मिळावे आणि त्याच्या प्रतिभाशक्तीला हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी विद्यार्थी विभागाचे ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन दि. १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत “कलाविश्व महाविद्यालय, शांतिनिकेतन, सांगली येथे आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. १६ फेब्रुवारी  २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ही माहिती कला संचालनालय महाराष्ट्र राज्यचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे यांनी दिली आहे.

            प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील लोकसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य आणि विधानसभा सदस्य उपस्थित राहणार आहेत. सुमारे २० वर्षांनंतर सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन होत आहे. हे प्रदर्शन सांगली येथे होण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. दृश्य कला क्षेत्रातील विद्यार्थी व उदयोन्मुख कलाकारांना आपली कला व्यापक स्तरावर सादर करता यावी, त्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दर वर्षी कला संचालनालयामार्फत महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित केले जाते. महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन हे महाराष्ट्राच्या कला सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण वारसा आहे.

            कला संचालक डॉ. किशोर इंगळे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात कला संचालनालयाच्या अंतर्गत शासकीय, शासनमान्य अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित कला संस्थांमध्ये दृश्य कलेचे पदवी, पदविका/ प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात. या सर्व कला संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य कला प्रदर्शन हे एक हक्काचे सर्वसमावेशक आणि प्रेरणादायी व्यासपीठ आहे. हे प्रदर्शन दर वर्षी राज्यातील विविध जिल्ह्यात आयोजित केले जाते. राज्य कला प्रदर्शनाच्या निमित्ताने दर वर्षी दृश्य कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंताचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान करण्यात येतो. या वर्षी ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर यांच्या दीर्घकालीन कलात्मक व शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात येत आहे.

            कला संचालक डॉ. किशोर इंगळे म्हणाले, प्रदर्शन एकूण आठ विभागात असणार आहे. यामध्ये रेखा व रंगकला, उपयोजित कला, शिल्पकला, मुद्राचित्रण, कला शिक्षक प्रशिक्षण, कला व हस्त व्यवसाय (धातूकाम, अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकाम, मातकाम), मूलभूत अभ्यासक्रम आणि दिव्यांग विभाग याचा समावेश आहे. प्रत्येक विभागातून चार कलाकृतींची पारितोषिकांसाठी निवड केली जाते. या वर्षी राज्यातील विविध कला संस्थांमधून ३ हजार ४९० विद्यार्थ्यांच्या एकूण ५ हजार ६८० कलाकृती प्राप्त झाल्या. प्राप्त कलाकृतीपैकी १ हजार २७५ कलाकृतींची निवड प्रदर्शन समितीने केली आहे.

            शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील प्रथम प्रत्येकी ५ याप्रमाणे एकूण १० आणि बाल चित्रकला स्पर्धेतील राज्यस्तरावरील १६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव प्रथमच राज्य कला प्रदर्शनाच्या व्यासपीठावर केला जात आहे. आजवर राज्य कला प्रदर्शन हे प्रामुख्याने कला महाविद्यालयीन विद्यार्थी आणि व्यावसायिक कलावंतांसाठी ओळखले जात असे, मात्र कला संचालनालयाच्या माध्यमातून शालेय स्तरावरील चिमुकल्या हातांना थेट राज्याच्या मुख्य कला प्रवाहात सामील करुन घेण्याचा क्रांतीकारक निर्णय मंत्री महोदयांनी घेतला आहे. राज्याच्या कला क्षेत्रासाठी ही उल्लेखनीय बाब आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कला महाविद्यालयीन विद्यार्थी, कला शिक्षक आणि कला रसिक यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. सात दिवस चालणारे हे कला प्रदर्शन सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!