विद्यार्थ्यांनी जीवनात श्रमसंस्कार आत्मसात करावे : जे के बापू जाधव
दुधोंडी येथे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिराचे उत्साहात उद्घाटन

दर्पण न्यूज पलूस रामानंदनगर :-“विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानात न रमता प्रत्यक्ष जीवनातील श्रमसंस्कार आत्मसात करणे गरजेचे आहे. श्रमाची लाज न बाळगता समाजहितासाठी झटल्यास व्यक्तीमत्वाची उत्तम जडणघडण होते,” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जे. के. जाधव यांनी केले. रयत शिक्षण संस्थेचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे दुधोंडी येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
‘स्वच्छ भारत – स्वस्थ भारत’ या संकल्पनेवर आधारित या शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी हायस्कूल, दुधोंडी येथे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने अत्यंत उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य विधिमंडळ, मुंबई येथील संशोधन अधिकारी बाबा वाघमारे यांनी ‘एन एस एस’च्या महत्त्वावर प्रकाश टाकला. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, जबाबदारीची जाणीव आणि राष्ट्रप्रेम निर्माण होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. युवकांनी केवळ स्वतःचा विचार न करता स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेऊन समाजात एकोपा निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. यु. व्ही. पाटील होत्या. त्यांनी आपल्या भाषणात स्वयंसेवकांना डिजिटल दुनियेच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे महत्त्व पटवून दिले. “श्रमसंस्कार हे केवळ शिबिरापुरते मर्यादित न ठेवता ते आयुष्यभर अंगी बाणावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास दुधोंडी ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले असून उद्घाटन सोहळ्यास सरपंच उषा देशमुख,
उपसरपंच विजय जाधव, सदस्य राजेश तिरमारे
बब्बर मुजावर , कुमार साळुंखे, श्रीकांत आरबुने उपस्थित होते. या शिबिरास विद्यालयाचे सचिव मिलिंद जाधव, आणि मानसिंग बँकेचे चेअरमन सुधीर जाधव यांचे विषेश सहकार्य लाभत आहे.
या प्रसंगी एनएसएस कार्यक्रमाधिकारी के. एस. गांगोडे यांनी प्रास्ताविकात शिबिराच्या ध्येय-धोरणांची माहिती दिली. या सात दिवसांच्या शिबिरात ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, जलसंवर्धन, आरोग्य जनजागृती आणि महिला सक्षमीकरण यांसारखे विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्यास सुधीर जाधव चेअरमन मानसिंग को -ऑपरेटिव्ह बँक दुधोंडी, सरपंच सौ. उषा देशमुख, उपसरपंच विजय जाधव आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिवाजी विद्यालयाचे सचिव मिलिंद जाधव आणि मुख्याध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. डी. पाटील यांनी केले, तर डी. पी. गवारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. दुधोंडी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हे शिबिर मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास सर्वच मान्यवरांनी व्यक्त केला.




