सांगली जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य पार पाडावे : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
जिल्हा परिषदेच्या आयुक्त तपासणीचे चार वर्षांचे अहवाल वाचन संपन्न

दर्पण न्यूज मिरज/सांगली : जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांनी नेमून दिलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या चोखपणे व पारदर्शकपणे पार पाडाव्यात, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज येथे दिल्या.
विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आयुक्त तपासणीचे चार वर्षांचे अहवाल वाचन बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मा. वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अप्पर आयुक्त (आस्थापना) पुणे नितीन माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रभारी अपर आयुक्त (विकास) पुणे रवींद्र कणसे, प्रभारी सहाय्यक आयुक्त (तपासणी) पुणे विजय धनवटे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद यंत्रणांचे विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
बालके व सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा, शिक्षण, ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छता, सुरळीत पाणीपुरवठा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आदिंबाबत संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून कामकाज करावे, असे सूचित करून विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवा. यामध्ये दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के व विहित वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांना भेट देऊन आढावा घ्यावा. ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छतेसाठी पूर्ण क्षमतेने काम करून स्वच्छतेबाबत सातत्य ठेवावे. वृक्षारोपणास प्राधान्य द्यावे. ग्रामीण भागात उद्योग आले तरच विकास होईल. उद्योग येण्यास काही अडचणी असतील तर त्याकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात, असे त्यांनी सूचित केले.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, आक्षेपाबाबत आलेले संदर्भ संबंधितांनी नीट तपासून वाचावे व त्याच्यावर कार्यवाही करावी. यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे. शासकीय रकमेचा अपहार झाल्यास तात्काळ कारवाई करा. दिव्यांगासाठी असलेल्या निधीचे उचित नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद सांगलीच्या केलेल्या कार्यालय तपासणीचे अहवाल वाचन जिल्हा परिषद सांगलीच्या सभागृहात अपर आयुक्त (आस्थापना) नितीन माने यांनी केले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आस्थापना, आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बाल विकास, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायत, मनरेगा, स्वामित्व योजना, समाज कल्याण विभाग, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग आदि विभागांचा आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जीआय सिस्टम पोर्टल, डिजिटल प्रॉपर्टी मॅनेजमेंट सिस्टम, ई- ऑफिस आदि नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्याहस्ते जिल्हा परिषद कार्यक्षेत्रांतर्गत दिव्यांगाना युडीआयडी कार्डचे वाटप, गुणवंत कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र, गायरान वाटप प्रमाणपत्र, घरकुल लाभार्थींना चावीचे वितरण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पीपीओ वाटप, शंभर टक्के अंधत्व असलेल्या ४० व्यक्तिंना उपकरण वाटप करण्यात आले. तसेच ओडिशा राज्यात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील आजींना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व त्यांच्या टीमचे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.



