जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक संपन्न

दर्पण न्यूज सांगली : जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पाडली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे उपव्यवस्थापक विशाल कुमार सिंग, भारतीय रिझर्नाव बँकेचे जिल्हा नोडल अधिकारी विशाल गोन्द्के, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापक विद्या कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख, विविध विकास महामंडळांचे व्यवस्थापक, बँकांचे समन्वयक उपस्थित होते.
या बैठकीत सन 2025-26 या आर्थिक वर्षात राष्ट्रीयीकृत बँक, खाजगी बँक, ग्रामीण बँक व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समुहांची सप्टेंबरअखेरील तिमाहीच्या उद्दिष्टपूर्ततेचा आढावा घेण्यात आला. कृषि व तत्सम क्षेत्र, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, अन्य प्राथमिक क्षेत्रे व अप्राथमिक क्षेत्रांतील उद्दिष्टपूर्ततेचा तसेच विविध शासकीय योजनांचा आढावाही यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विविध बँकांचे प्रतिनिधी, विविध महामंडळांचे जिल्हा समन्वयक यांच्याकडून आढावा घेतला. तसेच यावेळी सांगली जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याचा प्रगती अहवालावर यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजना, विविध महामंडळांकडील योजना, प्रशिक्षण आदिंच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. स्वागत विश्वास वेताळ यांनी केले. आभार ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) चे संचालक महेश पाटील यांनी मानले.
———–
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न
सांगली :-: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, यांच्यासह आरोग्य व पोलीस यंत्रणांचे तालुकास्तरीय संबंधित अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणे, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे व सद्यस्थिती, जातीच्या दाखल्याची प्रलंबित प्रकरणे, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे, तक्रारी, अत्याचार पीडितांना नुकसान भरपाई, गंभीर गुन्ह्यांतील पीडितांच्या वारसांचे पुनर्वसन आदिंचा आढावा घेतला.
यावेळी बाळासाहेब कामत यांनी प्रलंबित प्रकरणे, मागील इतिवृत्त, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे याचा आढावा समितीसमोर दिला.



