महाराष्ट्रसामाजिक

जागतिक पर्यटन केंद्राच्या दिशेने तेरचे आणखी एक पाऊल : आमदार राणाजगजितसिंह पाटील

सातवाहन कालीन तीर्थकुंडासाठी साडेतीन कोटी

 

 

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे):-
तब्बल दोन हजार वर्षांपेक्षा अधिक पुरातन सांस्कृतिक वारसा लाभलेल्या प्राचीन तीर्थकुंडासाठी तीन कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापूर्वी या तीर्थकुंडाच्या जतन आणि संवर्धनासाठी एक कोटी ६४ लाख रुपये उपलब्ध झालेले आहेत. एकूण पाच कोटी ११ लाख रुपयांच्या माध्यमातून इ.स. पहिल्या शतकातील घडामोडींचे साक्षीदार असलेल्या या प्राचीन तीर्थकुंडाला आता नवी झळाळी मिळणार आहे. त्यामुळे तेर येथील प्राचीन अवशेषांची ठळक ओळख जगासमोर येणार आहे. त्यातून जगभरातील अभ्यासक आणि पर्यटक या वारसा स्थळांकडे आकर्षित होतील. त्यामुळे तेरची जागतिक पर्यटन केंद्राच्या दिशेने सक्षम वाटचाल सुरू असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

  • संतश्रेष्ठ गोरोबाका6का यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धाराशिव तालुक्यातील तेर येथे आजही मोठा ऐतिहासिक वारसा पाहायला मिळतो. येथील अनेक प्राचीन अवशेष आणि साधने उत्खननात आढळून आली आहेत. त्यामुळे तेर आणि परिसरातील इतिहासाच्या पाऊलखुणांनी जगभरातील अभ्यासक आणि पर्यटकांना नेहमीच आकर्षित केले आहे. तेर येथे सन १९८७ – ८८ या कालावधीत प्रदीप केशवराव व्यास यांच्या शेतामध्ये उत्खनन करण्यात आले होते. त्यावेळी या सातवाहन कालीन तीर्थकुंडाचे अवशेष समोर आले. पक्क्या विटांनी बांधल्या गेलेल्या या तीर्थकुंडाच्या उत्खननात हस्तिदंती फणी, लज्जागौरीची शिल्प यासह बरीच सातवाहनकालीन नाणीही प्राप्त झाली होती. पुरातन सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या तीर्थकुंडाच्या जतन आणि संवर्धनासाठी पाच कोटी ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घेण्यात आपल्याला यश मिळाले आहे. यापूर्वी १ कोटी ६२ लाख रुपये उपलब्ध झाले असून त्यातून तीर्थकुंडाच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरूही करण्यात आले आहे. उर्वरित कामासाठी बुधवार १० डिसेंबर रोजी तीन कोटी ६५ लाख रुपयांचा निधी आपल्या महायुती सरकारने मंजूर केला असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

  • सध्या तेर येथील कोट टेकडीवर उत्खननाची जिवंत प्रात्यक्षिक प्रयोगशाळा विकसित करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी आपण मोठा पाठपुरावा करून १३ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्राचीन तीर्थकुंडासाठी ५ कोटी ११ लाख, बौद्ध स्तूप विकसित करण्यासाठी २ कोटी २१ लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. राज्यातील सर्वात पुरातन मंदिर अशी ख्याती असलेल्या चौथ्या शतकातील त्रिविक्रम मंदिराचे रु.२ कोटी ९० लाख निधीतून जतन आणि संवर्धनाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तर संतश्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पहिल्या टप्प्यात १३ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. आपल्या महायुती सरकारने तेर आणि परिसरातील प्राचीन वास्तू आणि मंदिरांना गतवैभव मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. तेरला जागतिक पर्यटन केंद्राच्या नकाशावर आणण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळत असल्याने मोठे आत्मिक समाधान लाभत आहे. हजारो वर्षापासून तेरच्या प्राचीन भूमीवरुन एक समृद्ध नागरी वस्तीची अनेक अभिमानस्थळे आजही आपल्याला पहायला मिळतात. दोन हजार वर्षाचा हा समृद्ध वारसा अनुभवता यावा यासाठी तेरला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!