कर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्या रूपाने वैयक्तिक मित्र गमावला ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 विधानसभा कामकाज

दर्पण न्यूज मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोकप्रस्ताव मांडत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कर्तृत्ववान, शिस्तप्रिय आणि निश्चयी नेतृत्व असलेल्या अजितदादांच्या रूपाने आपण वैयक्तिक मित्र गमावला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोकप्रस्तावावर म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यमग्नतेचे प्रतीक होते. वक्तशीरपणा, शिस्त आणि निर्णयक्षमतेची सांगड त्यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत घातली. मंत्रालयात वेळेआधी उपस्थित राहून दिवसभर कामकाजाचा आढावा घेणे आणि कोणतीही फाईल प्रलंबित न ठेवणे ही त्यांची कार्यपद्धती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रशासनात एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असे.
प्रत्येक विषयाचा बारकाईने अभ्यास, स्पष्ट भूमिका आणि निर्णय घेण्यातील धाडस यामुळे ते प्रभावी प्रशासक म्हणून ओळखले जात. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाची भावना होती. राज्यहिताचा प्रश्न आला की, राजकीय भेदाभेद बाजूला ठेवून सकारात्मक भूमिका घेणे ही त्यांची कार्यसंस्कृती होती, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्याच्या विकासात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पायाभूत सुविधा, वित्त, शेती आणि सिंचन या क्षेत्रांत त्यांनी ठोस आणि दूरगामी निर्णय घेतले. लोककल्याणाच्या योजनांबाबत त्यांनी ठाम भूमिका घेत राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याचा ठसा आणि त्यांनी निर्माण केलेली कार्यसंस्कृती पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा शब्दात त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
“अजित पवारांच्या रुपात महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री मिळाला असता”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘अजित पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड’, अजितदादाच्या रुपात एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता, तो आता आपल्यामध्ये नाही. त्यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी आवश्यक संपूर्ण क्षमता, दृढ निश्चय आणि प्रामाणिकता होती, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
दिवंगत अजित पवारांसारखा नेता जेव्हा आपल्यातून निघून जातो, तेव्हा खऱ्या अर्थानं पोकळी म्हणजे काय हे लक्षात येतं. ती पोकळी केवळ राजकीय नाही, तर भावनिकही आहे. काही जखमा काळ बऱ्या करतो, पण काही वेदना कायम राहतात, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी मंत्री सुरुपसिंग नाईक, डॉ. शालिनीताई वसंतराव पाटील, राज खंगारजी पुरोहित तसेच माजी सदस्य गंगाधर महालप्पा पटने, नीळकंठ चिंतामण फालक, विश्वास रामचंद्र नांदेकर आणि रुपलेखा खंडेराव ढोरे यांच्या निधनाबद्दलही शोक व्यक्त केला.
00000
विधानसभेत दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली;
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थानाचा विधानसभाध्यक्षांचा प्रस्ताव
मुंबई, दि. २३ : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन राज्यासाठी आणि देशासाठी देखील मोठे नुकसान झाले आहे. या शब्दात विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सहवेदना व्यक्त केल्या. अजित पवार यांच्याबद्दल सभागृहातील सदस्यांच्या भावना विचारात घेता विधिमंडळ परिसरात अजित पवार यांचे स्मृतीस्थान असावे, असा मानस इच्छा व्यक्त करुन शासनासमोर याबाबतचा प्रस्ताव मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री सुरुपसिंग नाईक, माजी मंत्री डॉ.शालिनीताई पाटील, माजी राज्यमंत्री राज पुरोहित, माजी सदस्य गंगाधर पटने, नीळकंठ फालक, विश्वास नांदेकर रुपलेखा ढोरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वातील शिस्त, वेळेचे काटेकोर पालन, कामातील परिपूर्णतेची जाणीव आणि सहकाऱ्यांप्रती असलेली आपुलकी यांचा उल्लेख करताना विधानसभा अध्यक्ष ॲड.नार्वेकर यांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी जाग्या केल्या. जीएसटी कौन्सिलमध्ये महाराष्ट्राची बाजू ठामपणे मांडणारा सक्षम अर्थमंत्री म्हणूनही त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. पहाटेपासून कामाला लागून कामकाजाची वेगळी पद्धत दाखवणारा नेता, दिलेला शब्द पाळणारा राजकारणी अशी त्यांची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी विधिमंडळाच्या आवारात त्यांच्या नावाने स्मृतीस्थान उभारण्याचा मानस असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. पुढील पिढ्यांना त्यांच्या कार्याची जाणीव राहावी, असे त्यांनी नमूद केले.
माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांनी आदिवासी समाजासाठी शिक्षण, सहकार आणि व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा विधानसभा अध्यक्षांनी गौरव केला. डॉ. शालिनीताई पाटील यांनी सहकार, शिक्षण आणि ग्रामीण आरोग्य क्षेत्रात उभारलेल्या संस्थांची माहिती त्यांनी दिली. माजी राज्यमंत्री राज पुरोहित यांच्या लढाऊ नेतृत्वाची आणि भाडेकरू-व्यापारी वर्गासाठी त्यांनी संघर्ष केल्याचे त्यांनी सांगितले. गंगाधर पटने, नीलकंठ चिंतामण फालक, विश्वास रामचंद्र नांदेकर आणि रुपलेखा ढोरे यांनी शिक्षण, सहकार, सामाजिक चळवळी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील केलेल्या योगदानाचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
यावेळी मंत्री छगन भुजबळ, ॲड.आशिष शेलार, हसन मुश्रीफ, गुलाबराव पाटील, अदिती तटकरे यांच्यासह सभागृहातील सदस्य भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुनील प्रभू, नितीन राऊत, रोहित पवार, विश्वजित कदम, जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर सभागृहातील सर्व सदस्यांनी शोकप्रस्तावास संमती देऊन दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.
०००००
ग्रामीण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अजित पवारांचा मोठा वाटा
– विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधान परिषदेत श्रद्धांजली अर्पण
- सदस्यांनी आठवणींना दिला उजाळा
दर्पण न्यूज मुंबई :- ग्रामीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून कार्य करणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील प्रभावी आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. कृषी, जलसंपदा आणि सिंचन या क्षेत्रांमध्ये त्यांनी सातत्याने पुढाकार घेत ग्रामीण भागाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम केले. ग्रामीण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा वाटा होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्याने अभ्यासू, निर्णयक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावले अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषदेत श्रद्धांजली अर्पण केली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर पटने, श्रीमती निला देसाई यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला त्यावर उपसभापती शिंदे बोलत होते.
सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, राज्याचा अर्थसंकल्प ११ वेळा मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून वित्तीय शिस्त आणि वास्तववादी नियोजनाचा आग्रह त्यांनी कायम ठेवला. दुष्काळी भागांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, कालवे व धरणे उभारणे, तसेच सिंचन प्रकल्पांना गती देणे यावर त्यांनी विशेष भर दिला. शेती हा केवळ व्यवसाय नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, या भूमिकेतून त्यांनी पाणी व्यवस्थापन आणि कृषी विकासाच्या योजनांना प्राधान्य दिले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली
– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शोकप्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. ‘विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही’ ही दादांची घोषणा आम्ही सत्यात उतरवू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती. फाईल हातात घेतल्यावर काही सेकंदात त्यांची नजर कागदावरून स्कॅन व्हायची आणि त्यातील चुका ते चटकन शोधायचे. साध्या वायर लटकत असल्या किंवा पायरी नीट बसवलेली नसली तरी ते संबधितांना सुनावत असत. ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. बाहेरून फणसासारखे काटेरी वाटत असले तरी आतून ते अत्यंत मृदू मनाचे होते. लाडकी बहीण योजनेसाठी ४६ हजार कोटींची तरतूद करताना त्यांनी अर्थकारणाचा समतोल उत्तम राखला होता.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, जनतेच्या प्रश्नांबाबत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. नागरिकांच्या निवेदनांचे बारकाईने परीक्षण करून योग्य ती कार्यवाही करण्याची त्यांची कार्यपद्धती उल्लेखनीय होती. कधी मतभेद असले तरी वैयक्तिक पातळीवर सौजन्यपूर्ण संबंध त्यांच्या सोबत कायम राहिले, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, माजी विधान परिषद सदस्य अशोक गजानन मोडक, गंगाधर पटने, श्रीमती निला देसाई या दिवंगत सदस्यांच्या वाटचालीला सभापती प्रा. राम शिंदे यांनी उजाळा दिला. दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून या दिवंगत सदस्यांना सर्व उपस्थित सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.
विधान परिषद सदस्य सर्वश्री उद्धव ठाकरे, प्रवीण दरेकर, सतेज पाटील, विक्रम काळे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, संजय खोडके, प्रसाद लाड, भाई जगताप, निरंजन डावखरे, पंकज भुजबळ, चित्रा वाघ, अभिजित वंजारी, मनिषा कायंदे, आमदार डॉ विश्वजीत कदम,सचिन अहिर, किरण सरनाईक यांनी मनोगत व्यक्त करीत सहवेदना व्यक्त केल्या.



