महाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञान

नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 ;  इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियातील प्रचाराच्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हाधिकारी अशोक काकडे

 

   दर्पण न्यूज मिरज/   सांगली : नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींची निवडणूक होत आहे. या अनुषंगाने निवडणूकविषयक सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणन करणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश 2025 संदर्भातील अधिसूचनेनुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांना समान संधी मिळण्याकरिता निवडणूकविषयक सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातीचे पूर्वप्रमाणन करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यूट्युब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खाजगी एफएम वाहिन्या, सिनेमागृहे, सार्वजनिक ठिकाणचे दृकश्राव्य फलक, (ऑडिओ व्हिज्युअल डिस्प्ले), ई वृत्तपत्रे, बल्क एसएमएस किंवा व्हॉईस एसएमएस, समाजमाध्यमे, संकेतस्थळे इत्यादि प्रकारच्या सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातींचे प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. तरी उमेदवारांनी सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणन केल्यानंतरच जाहिरात प्रसारित करावी. जाहिरातीच्या प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज व अन्य अनुषंगिक माहितीसाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील माध्यम कक्षाशी संपर्क साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!