२० आधार सेवा केंद्र चालकांना नवीन अद्ययावत किटचे वाटप ; जिल्हाधिकारी अशोक काकडे
नवीन किटमुळे आधार सेवा अधिक सुलभ, दर्जेदार होण्यास मदत ;एका संचात १५ वस्तुंचा समावेश

दर्पण न्यूज मिरज / सांगली -: नवीन किटमुळे आधार नोंदणी व संबंधित अन्य सेवा अधिक गतिमान आणि त्रुटीमुक्त होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आधार सेवा अधिक सुलभ आणि दर्जेदार होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी येथे केले.
जिल्ह्यातील २० आधार सेवा केंद्र चालकांना जुन्या आधार किट ऐवजी नवीन अद्ययावत आधार किटचे वाटप जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा व्यवस्थापक संचित पवार आदि उपस्थित होते.
दहा वर्षांपूर्वी आधार सेवा केंद्रांना देण्यात आलेल्या जुन्या किटमधील साहित्य दीर्घकाळाच्या वापरामुळे निकामी होऊ लागले होते. लॅपटॉप वारंवार बंद पडणे, प्रिंटर खराब होणे, स्कॅनिंग दर्जा कमी होणे, तसेच आयरिश व फिंगरप्रिंट स्कॅनिंगमध्ये त्रुटी येणे यामुळे चालकांबरोबरच नागरिकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनानुसार निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांच्या कार्यवाहीने जिल्ह्यातील २० आधार सेवा केंद्र चालकांना नवीन आधार संच वाटप करण्यात आले. या संचात १५ वस्तूंचा समावेश असून यात लॅपटॉप, प्रिंटर, मॉनिटर, फिंगर स्कॅनर, सिंगल फिंगर स्कॅनर, आयरिश स्कॅनर, सिंगल आयरिश स्कॅनर, वेब कॅमेरा, जीपीएस डिव्हाइस, पांढरा पडदा, बल्ब इत्यादी अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला सीनियर सपोर्ट इंजिनिअर विपुल मद्वाण्णा, अशोक कोरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आधार सेवा केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


