प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना सुजाण आणि स्वावलंबी नागरिक बनण्याचे प्रशिक्षण ; जिल्हाधिकारी अशोक काकडे
दिव्यांग, बालसुधारगृहातील विद्यार्थीनिर्मित दिवाळी सजावटीच्या वस्तुंच्या प्रदर्शनास भरभरून प्रतिसाद


दर्पण न्यूज मिरज/ सांगली – : “माझी सांगली माझा अभियान” या उपक्रमांतर्गत सांगली पॅटर्न विकसीत केला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच बालसुधारगृहातील विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी, त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत केली जात आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध सजावटीच्या वस्तू या मुलांकडून तयार करून त्याचे प्रदर्शन व विक्री केली जात आहे. या उपक्रमातून मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे आणि भविष्यकाळामध्ये स्वयंरोजगारातून एक सुजाण आणि स्वावलंबी नागरिक बनण्याचे नक्कीच प्रशिक्षण मिळणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजला येथे दिव्यांग व बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिवाळीसाठीच्या वस्तुंच्या प्रदर्शनाचे संयुक्त उद्घाटन खासदार विशाल पाटील व जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा विभाग पुणे चे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, सांगली पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अजयकुमार पवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी भारत निकम, जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, दिव्यांग व बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंच्या प्रदर्शनाला सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणावर भेट देवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच त्या वस्तु खरेदी करून प्रदर्शनास भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्याच्या आधारे दिवाळी सजावटीच्या केलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. याच्यातून खऱ्या अर्थाने भविष्यातील सांगली, जे आमचे व्हीजन 2030 आहे, ते घडविण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न आहे. त्याला सांगलीकरांनी उत्स्फूर्तपणे भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी सांगलीकरांचे आभार मानले व सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
आजच्या या प्रदर्शनास जास्तीत जास्त सांगलीकरांनी भेट देवून मुलांकडून त्यांनी तयार केलेल्या वस्तू विकत घ्याव्यात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल असे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या संस्थांचे अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिव्यांग व बालगृहातील मुलांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा एक उपक्रम आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यात दिवसभर हे प्रदर्शन लावण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रदर्शनात जवळपास 24 संस्थातील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. या प्रदर्शनात दिव्यांग, बालगृहातील मुलांनी तयार केलेल्या विविध सजावटीच्या, शोभेच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंच्या विक्रीतून दिवसभरात जवळपास 1 लाख 2 हजार 757 रूपये जमा झाले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, तहसीलदार अमोल कुंभार, तहसिलदार (सर्वसाधारण) लिना खरात यांच्यासह संस्थाचे शिक्षक, कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.


