पलूस येथे कृषि विभागामार्फत रब्बी हंगाम नियोजन व साथी पोर्टल प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात



दर्पण न्यूज पलूस :- पलूस तालुका येथील सर्व कृषि निविष्ठा विक्रेते यांना कृषि विभाग महाराष्ट्र शासन मार्फत रब्बी हंगाम नियोजन व बियाणे वितरण प्रणालीची आवश्यक असणारी साथी पोर्टल बाबतचे प्रशिक्षण दिनांक. ०८/१०/२०२५ रोजी संग्राम लॉन्स MIDC पलूस येथे देण्यात आले.
पलूस तालुका हा बारमाही बागायत तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे रब्बी हंगाम तितकाच महत्वाचा आणि उत्पादक समजला जातो. गहू, हरभरा, र. ज्वारी, भाजीपाला ह्या हंगामी पिकाबरोबर नगदी पिक ऊस, हळद, आले तसेच द्राक्ष, केळी, पेरू अशा फळपिकांचेही विक्रमी उत्पादन घेतले जाते. त्याअनुषंगाने शेतकरी यांना मिळणाऱ्या खते, बियाणे व कीटकनाशके ई. निविष्ठा दर्जेदार व वेळेत उपलब्ध करून देणारी एक यंत्रणा म्हणून कृषि निविष्ठा विक्रेते यांची रब्बी हंगाम पूर्व नियोजन बैठक घेण्यात आली.
सदर बैठक मा. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सांगली श्री. विवेक कुंभार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. श्री. कुंभार यांनी शेतकरी यांच्या दृष्टीने कृषि निविष्ठा विक्रेते म्हणजे एक ट्रस्टी (विश्वासू) म्हणून पाहिले जाते व त्यांनी दिलेली निविष्ठा सांगितलेल्या प्रमाणांतच वापरल्या जातात. त्यामुळे आपली दुहेरी जबाबदारी असल्याचे नमूद केले, निविष्ठा ह्या गुणवत्तापूर्वक, वेळेत आणि तक्ररीरहित पुरवण्याबाबत निक्षून सांगितले अन्यथा कारवाई केली जाईल अश्या सूचना दिल्या. रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या बियाणाच्या वितरणासाठी केंद्र शासनाने लागू केलेल्या साथी पोर्टल बाबत सविस्तर सादरीकरण करून त्याबाबतच्या सर्व शंकांचे निरसन मा, तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण निरीक्षक) विभागीय कृषि सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर श्री. प्रल्हाद साळुंखे यांनी केले. त्याचबरोबर साथी पोर्टल वरून बियाणे विक्री बंधनकारक असून विक्री न करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश तालुका गुण नियंत्रक यांना देण्यात आले. मा. मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली श्री. अमोल आमले यांनी ई-पॉस मशीन मधील अनुदानित खत साठा वितरीत करताना रिअल टाईम डेटा मध्ये नोंद करावी व top २० बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मा. तालुका कृषि अधिकारी श्री. दिपक कांबळे यांनी रब्बी हंगाम नियोजन व शासकीय योजना बाबत सविस्तर चर्चा करून महाविस्तार aap वापरण्याबाबत आवाहन करण्यात आले. कृषि निविष्ठा विक्रेते प्रतिनिधी म्हणून श्री. धोंडीराम अर्जुने व श्री. संदीप सिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन व प्रस्ताविक कृषि अधिकारी (गुण नियंत्रक) श्री. अरविंद यमगर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. संतोष चव्हाण सहाय्यक कृषि अधिकारी यांनी केले व उपस्थितांचे आभार श्री. उदय दौंड उप कृषि अधिकारी यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता केली.


