जरबेरा शेतीची ‘विद्या’ – विद्या बोरुडकर
उत्सव नवदुर्गांचा - सन्मान स्त्री शक्तीचा पुष्प - 3

सोमवारपासून नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला. हा महोत्सव म्हणजे देवी आईच्या सामर्थ्याचा उत्सव. या नऊ दिवसाच्या कालखंडात दुर्गेची नऊ विविध रूपे आपल्याला त्याग, धैर्य, करुणा, समता आणि आणि वेळप्रसंगी पराक्रम शिकवतात. दुर्गेच्या या विविध रुपात समाजातील काही स्त्रिया आपल्या आजूबाजूला निदर्शनाला येतात. कुटुंबाच्या – समाजाच्या उत्कर्षासाठी स्वतःला जमिनीत गाढून घेतात. आजूबाजूच्या परिसरात आपल्या कार्यकर्तृत्वाने एक नवीन अंकूर रुजवितात. खऱ्या अर्थाने जणू त्या नवदुर्गेच एक नवीन रुपच साकारतात. समाजातील अशाच एका नवदुर्गेची ही कहाणी.
आजच्या काळात ग्रामीण आणि शहरी महिला असा कोणताही भेद राहिलेला नाही. समाजातील सर्वच क्षेत्रात महिलांनी आपले कर्तुत्व गाजवले आहे यात शंका नाही. महिलांच्या या कार्यकर्तृत्वाला शासनातील अनेक विभागांनी आपले पाठबळ दिले आहे. त्यापैकीच एक म्हणजे माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या जोडीलाच बालिंगा येथील अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र. आजच्या तिसऱ्या पुष्पात आपण करवीर तालुक्यातील कुडित्रे येथील ध्यास महिला बचत गटाची कहाणी जाणून घेणार आहोत. मी विद्या दत्तात्रय बोरुडकर.
माझ्या अध्यक्षतेखाली दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी स्थापन झालेल्या या महिला बचत गटाने कुक्कुटपालन आणि जरबेरा शेतीमध्ये आपला एक आगळा वेगळा ठसा उमटविला आहे. आमच्या बचत गटाची स्थापना झाल्यानंतर प्रारंभी यासाठी आवश्यक ते सर्व रितसर प्रशिक्षण आम्ही घेतले. यामध्ये कार्यरत असलेल्या 10 सदस्यांनी प्रति सदस्य 100 रुपये इतकी बचत सुरू केली. आमच्या गटाला आयसीआयसीआय बँकेकडून 70 हजार रुपयांचे पहिले कर्ज मिळाले. त्यातील 20 हजार रुपये मी कुक्कुटपालन व्यवसायासाठी वापरले. या व्यवसायातून मला थोडाफार नफा मिळाला. या नफ्यापेक्षा मला अधिक आत्मविश्वास मिळाला आणि मी हा व्यवसाय अधिक वाढविण्याचे ठरविले.
पहिले कर्ज व्यवस्थित फेडल्यानंतर, मला दुसरे कर्ज मंजूर झाले आणि कुक्कुटपालनासोबतच मी या व्यवसायाला जोडधंदा म्हणून फुले आणि भाजीपाला व्यवसाय सुरू केला. माझ्या या व्यवसायाला खऱ्या अर्थाने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) कोल्हापूर व अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र बालिंगा यांनी पाठबळ दिले. त्यांनी फुल शेती आणि शेतीमाल एक्सपोर्ट याचे प्रशिक्षण आम्हाला दिले. त्यानंतर आमच्या महिला बचत गटाने पाठीमागे वळून पाहिले नाही. आम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सहाय्याने सुमारे साडे सहा लाख रुपये बँक ऑफ इंडिया शाखेकडून मंजूर झाले तर वैयक्तिक दहा लाख रुपये कर्ज मंजूर करून घेवून आम्ही 16 गुंठ्यामधील पॉली हाऊस शेडमध्ये सुमारे 3 हजार जरबेरा फुलांच्या रोपांची लागवड केली. तीन महिन्यानंतर या रोपांना फुले येण्यास सुरुवात झाली.
ही विक्री योग्य फुले आम्ही मुंबई, हैदराबाद, गोवा, पुणे येथे विक्रीसाठी पाठविली. याच्या वाहतुकीसाठी आम्ही स्वतःचीच गाडी वापरली. त्यामुळे आमचे अधिकचे गाडी भाडेही वाचले. या जरबेरा फुलांना इतर दिवसांच्या तुलनेत सीझनच्या वेळेस अधिक दर मिळत असल्याने यावरच अधिक लक्ष केंद्रीत केले. या विक्रीतून आम्हाला महिन्याकाठी तब्बल 40 हजार रुपयांचा फायदा होतो आहे. केवळ जरबेरा फुल विक्री अथवा कुकूटपालन यावरच समाधान न मानता फुलांच्या विक्रीबरोबर मी बुके, स्वागत कमान, लग्न, इतर सजावट या सर्वांच्यासाठी लागणारे साहित्य तयार करून देते. या सर्वांच्या कामातून मला समाधानकारक आर्थिक फायदा मिळतोच परंतु आत्मनिर्भर होण्याचा मार्गही मिळाला यात शंका नाही. या व्यवसायामुळे मी माझ्यासोबत इतर सहा महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकले याचे मला अत्यंत समाधान आहे.
माझ्या या व्यवसायावरील निष्ठेमुळे मला माविमकडून यशस्वी उद्योजिका आणि कुडित्रे ग्रामपंचायततर्फे अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त झाला. या माझ्या व्यवसाय वृद्धीसाठी माविम व अस्मिता साधन केंद्र-बालिंगा यांचे मोलाचे योगदान मिळाले. हे नाकारून चालणार नाही. भविष्यात मला हा माझा महिला बचत गट संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात क्रमांक एकवर आणावयाचा असून त्यासाठी मी हवे तेवढे कष्ट घेण्यास तयार आहे, असे सांगताना त्या म्हणतात, “अभी तो नापी है मुट्टी भर जमीन, अभी तो आसमान बाकी है !! त्यांच्या या सोनेरी प्रवासाला मनःपूर्वक शुभेच्छा.– फारूक बागवान
माहिती अधिकारी-9881400405
जिल्हा माहिती कार्यालय- कोल्हापूर