महाराष्ट्र

अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

तहसिलदार कार्यालय वाळवा-ईश्वरपूर येथे जात प्रमाणपत्र व लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत सातबारा वाटप

 

  दर्पण न्यूज मिरज /   सांगली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा. कुठल्याही शासकीय कार्यालयात गेल्यानंतर आपल्याला सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सौजन्याची वागणूक मिळेल. प्रत्येक स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी लोकांसोबत भेटून नागरिकांच्या अडचणी जाणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.    तहसिलदार कार्यालय वाळवा-ईश्वरपूर येथे वाळवा तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील नागरिकांना जात प्रमाणपत्र वाटप व लक्ष्मी मुक्ती योजना लाभार्थी यांना सातबारा वाटप पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, वाळवा विभाग ईश्वरपूर उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसिलदार सारिका रासकर, आष्टा अपर तहसिलदार राजशेखर लिंबारे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, उरूण ईश्वरपूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील आदि उपस्थित होते.

  विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, शासन समाजातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी काही ना काही चांगल्या योजना राबवत असते. पतीच्या संमतीने सातबारावर पत्नीचे नाव लावण्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजना राबविण्यात येत आहे.  शासन दरबारी होणाऱ्या प्रत्येक कामासाठी ७/१२ लागतो. ७/१२ ला नाव लागल्यानंतर कधी दुर्दैवाने नैसर्गिक आपत्ती आली आणि आपल्या पिकांचे नुकसान झाले तर ते आपल्या दोघांच्या जॉइंट अकाउंटमध्ये ते पैसे जमा होतील. जेणेकरून आपल्यामध्ये कुटुंबांमध्ये वाद होणार नाहीत, असे सांगून विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी मात्र आई-वडील हयात असेपर्यंत सातबारावर निश्चितपणे आई-वडीलांचेच नाव असावे याची काळजी घ्यावी, असा प्रेमळ सल्ला दिला.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, विहीत वेळेत जातीचे प्रमाणपत्र मिळाल्यास त्याचा लाभ पुढील उच्च शिक्षणासाठी, शासकीय नोकरीसाठी होईल. व्हॅलिडिटी प्रमाणपत्रासाठी विहित वेळेत अर्ज करावा त्यामुळे ते तातडीने मिळेल व पुढे कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगून त्यांनी सामान्य नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी आयुष्मान भारत कार्ड काढून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच जिल्हाधिकारी अशोक काकडे राबवत असलेल्या विविध लोकाभिमुख उपक्रमांबद्दल त्यांनी विशेष अभिनंदन केले.

        जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, आज जवळपास पावणेदोनशे लोकांना जातीचे दाखले दिले आहेत. आता या दाखल्यांमुळे त्यांच्यासाठी शासनाच्या सर्व लाभाच्या योजनांचे दरवाजे उघडणार आहेत. जातीच्या दाखल्यांपेक्षाही ‘लक्ष्मी मुक्ती’ योजनेअंतर्गत ज्या आमच्या भगिनी आहेत, त्यांचे नाव त्यांच्या पतीच्या नावाबरोबर एकाच वेळी लावले गेले आहे. दोघांचे नाव मालमत्तेवर एकत्र येणे हा एक नवीन विचार आहे. घराची लक्ष्मी असलेल्या महिलेला तुम्ही सन्मानाने स्थान दिले आहे, त्यामुळे तुमच्या घरात सुख आणि ऐश्वर्य नक्कीच येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

  प्रास्ताविक तहसिलदार सारिका रासकर यांनी केले. मंडल अधिकारी रूक्साना तांबोळी यांनी आभार मानले. कार्यक्रमास लाभार्थी, नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!