ग्रामीणमहाराष्ट्र

प्रधानमंत्री आवास योजना : सांगली जिल्ह्यातील घरकुल मंजुरीपत्रसाठी २८,४१२ लाभार्थीं, प्रथम हप्ता लाभ वितरण  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात राज्यस्तरीय कार्यक्रम

 

 

  दर्पण न्यूज    सांगली  : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत राज्यातील 20 लाख लाभार्थींना मंजुरी पत्र व 10 लाख लाभार्थींना एक क्लिक वर पहिला हप्ता वितरण कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पुणे येथे संपन्न झाला. यामध्ये सांगली जिल्ह्यातील २८ हजार ४१२ लाभार्थींना मंजुरीपत्र आणि प्रथम हप्ता वितरणसाठी १६ हजार २६७ लाभार्थींचा समावेश आहे. याअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम कृष्णा मॅरेज हॉल, पोलीस मुख्यालय विश्रामबाग येथे झाला. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे आदि उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण-2 अंतर्गत ३१ हजार ८७१ इतक्या घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त असून १००  टक्के मंजुरी व प्रथम हप्ता वितरणाची कार्यवाही सुरु आहे.

खासदार विशाल पाटील म्हणाले, घरकुलासाठी शासनाने दिलेल्या निधीचा उपयोग योग्य रीतीने करून चांगले बांधकाम करा. जे लाभार्थी भूमिहीन आहेत, त्यांनी जागेसाठी त्वरित अर्ज करावा, त्यांना घर बांधकामासाठी गायरान जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी आश्वासित केले.

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, प्रत्येकाला स्वतःचे घर असावे, या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली आहे. याचा पुरेपूर सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत राज्यातील 20 लाख लाभार्थींना मंजुरी पत्र वितरण व 10 लाख लाभार्थींना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम आज होत आहे. जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या या मदतीतून लाभार्थीचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. लाभार्थींना चार हप्त्यात घरबांधणीसाठी निधी मिळणार आहे. तसेच, लाभार्थींना शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंजुरी देण्यासाठी प्रयत्न करू. लाभार्थींना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसेल तर ग्रामपंचायतीकडे जागेसाठी मागणी करावी. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावी. आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करून घ्यावे. घरकुल बांधकामाच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी लाभार्थींनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन अतुल नांद्रेकर यांनी केले. आभार संदीप कोटकर यांनी मानले.

लाभार्थी जयश्री झांबरे व लक्ष्मण पुजारी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करताना आपल्या घरकुलाचे स्वप्न शासनाने हातभार लावल्यामुळे पूर्ण होत असल्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले.

यावेळी लाभार्थींनी घरकुलासाठीचा पहिला रू १५ हजारचा हप्ता जमा झाल्याबाबतचा मोबाईलवर आलेला संदेश हात उंचावून दाखवला. तसेच, यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक तालुक्यातील दोन लाभार्थींना प्रत्यक्ष मंजुरीपत्र देण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!