शिवशस्त्र शौर्यगाथा वाघनख आंतरराष्ट्रीय शस्त्र प्रदर्शनासाठी चोख नियोजन करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
दसरा महोत्सवासह शिव शाहूंच्या विचार कार्याचा होणार जागर

दर्पण न्यूज कोल्हापूर -: राज्य शासनाच्या वतीने शिवशस्त्र शौर्यगाथा वाघनख हे आंतरराष्ट्रीय शस्त्र प्रदर्शन लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये आठ महिने भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दसऱ्या दरम्यान होणार असून शाहू जन्मस्थळाच्या कामांच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पणही याच कालावधीत होणार आहे. या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा हा दसरा महोत्सवाला साजेसा भव्य पद्धतीने होण्यासाठी चोख नियोजन करा. तसेच या सोहळ्यामध्ये इतिहास तज्ञ, इतिहास संशोधक, अभ्यासक व शिव, शाहू प्रेमींचा सहभाग घ्या. या सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचार, कार्याचा जागर होईल, अशा पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करा, तसेच पारंपरिक बाज (हेरिटेज लुक) दिसून येईल यादृष्टीने प्रदर्शन स्थळाचे सुशोभीकरण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
350 व्या शिवराज्याभिषेक वर्षाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागा अंतर्गत पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या वतीने शिवशस्त्र शौर्यगाथा वाघनख या आंतरराष्ट्रीय शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळावरील संग्रहालयातील अस्थाई दालनामध्ये करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार आयोजित करण्यात येणार असून यासाठीची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक उदय सुर्वे, समन्वयक उत्तम कांबळे तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, शिवशस्त्र शौर्यगाथा वाघनखाचे प्रदर्शन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर नगरीत शाहू महाराजांच्या जन्म स्थळी भरवण्यात येणार आहे, ही कोल्हापूर वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. करवीर नगरीला साजेसा समारंभ होईल अशा पद्धतीने या प्रदर्शन सोहळ्याचे नियोजन करा. प्रदर्शन कालावधीत भरवण्यात येणाऱ्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या सर्व परिसराची साफसफाई करुन घ्या. प्रवेशद्वारावरील कमान आकर्षक व भव्य पद्धतीने सुशोभित करा. परिसरातील बांधकाम दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करुन घ्यावीत. या मार्गावर दिशादर्शक फलक लावणे, रस्त्यांची दुरुस्ती, प्रदर्शन स्थळाच्या परिसरातील साफसफाई ही कामे महानगरपालिकेने करुन घ्यावीत. प्रदर्शनाच्या माहितीचा फलक विमानतळ, रेल्वे स्थानक, बसस्थानक, रंकाळा, अंबाबाई मंदिर अशा वर्दळीच्या ठिकाणी लावण्यासाठी नियोजन करा. युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झालेल्या 12 किल्ल्यांची माहिती व पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यासाठी तयारी करा. याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे माहिती फलकही याठिकाणी लावा. शहरातील विविध ठिकाणांहून प्रदर्शन स्थळी पोहोचण्याचे अंतर दर्शवणारे माहिती फलक ठिकठिकाणी लावा. प्रदर्शन स्थळी पोहोचण्यासाठी छोट्या बसेस, रिक्षा, पिंक ई रिक्षाची सोय उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करा. तसेच संबंधित सर्व विभागांच्या समन्वयातून सर्व कामे वेळेत पार पाडा. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी सुसज्ज पार्किंगची व्यवस्था व गर्दीचे व्यवस्थापन पोलीस व वाहतूक विभागाने करावे.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, या प्रदर्शनाला शाळा, महाविद्यालयांमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भेट द्यावी. तसेच ऐतिहासिक व शिव, शाहू विचार कार्यावर आधारीत निबंध, वक्तृत्व, चित्रकला, पोवाडा आदी स्पर्धांचे चोख नियोजन शिक्षण विभागाने करावे, असे सांगून या प्रदर्शनावर आधारित माहितीपट तयार करुन विविध ठिकाणी सादरीकरण करा. प्रदर्शनाला भेट देणारे विद्यार्थी, नागरिकांना शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित होलोग्राफीक शो दाखवण्यात येणार असून या प्रदर्शनाला जास्तीत जास्त लोकांनी भेट देण्यासाठी प्रदर्शनाविषयी व्यापक प्रसिद्धी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस म्हणाले, कोल्हापूरमध्ये भरवण्यात येणाऱ्या शिवशस्त्र शौर्यगाथा वाघनखाच्या प्रदर्शनाला तसेच शहरातील ऐतिहासिक ठिकाणांना विविध शाळांतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. याबरोबरच निबंध, वक्तृत्व, चित्रकला, पोवाडा आदी स्पर्धांचे नियोजनही करण्यात येत आहे.