महाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानसामाजिक

सांगली आयर्विन पूल, हरिपूरचा घाट परिसराची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून पाहणी ; प्रशासन सज्जतेचा आढावा

 

 

दर्पण न्यूज सांगली : लगतच्या जिल्ह्यात व सांगली जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे संभाव्य आपत्ती परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज १९ रोजी आयर्विन पुलाजवळील कृष्णा नदी घाट, तसेच हरिपूरचा घाट येथे प्रत्यक्ष भेट देऊन संभाव्य आपत्कालिन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्जतेचा आढावा घेतला.

आयर्विन पुलाजवळील कृष्णा नदी घाट येथे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी उपस्थित होते. यावेळी मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, सांगलीच्या अप्पर तहसिलदार अश्विनी वरुटे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे, महापालिका कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण, एनडीआरएफचे इन्स्पेक्टर सुशांत शेट्टी आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आपत्ती काळात करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी या संदर्भात योग्य ते निर्देश यंत्रणांना दिले.

संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सर्व बाजूंनी सज्ज असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, महानगरपालिका, महसूल यंत्रणा, जलसंपदा विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पोलीस विभाग तसेच, आरोग्य विभाग या सर्व विभागांकडून वेळोवेळी नागरिकांना मदत देण्यात येईल. सूर्यवंशी प्लॉट, इनामदार मळा, मगरमच्छ कॉलनी या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे. संभाव्य पूरपरिस्थितीत शासकीय यंत्रणा कार्यान्वित होऊन नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी नागरिकांनी केवळ शासकीय यंत्रणा व संकेतस्थळावरील माहितीवर लक्ष ठेवून दक्ष राहावे, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.

चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या अनुषंगाने धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दोन्ही धरणांतून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने प्रशासन सतर्क असून, सर्व यंत्रणा परस्पर समन्वय ठेवून आहेत.

00000

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!