आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानसामाजिक

अपूर्ण नव्हे, तर स्वयंभू… मन में है विश्वास, हम होंगे कामयाब!

 

 

त्यांचे जगच वेगळे… शब्दांच्या पलीकडचे, केवळ सांकेतिक खुणांचे आणि नजरेतील भावांचे. ही भाषा कदाचित आपल्याला सहज कळणार नाही, पण त्यांच्या डोळ्यांतील चमक बघा… त्यात भविष्याबद्दलचा अढळ विश्वास दिसतो. जणू काही ते साऱ्या जगाला न बोलता सांगत आहेत, “आम्ही अपूर्ण नाही, आम्ही स्वयंभू आहोत! तुम्ही फक्त आमच्या पाठीवर विश्वासाचा हात ठेवा आणि लढ म्हणा, मग बघा, आम्ही हे जग मुठीत कसे आणतो!”

हाच निःशब्द, तरीही अत्यंत प्रभावी संवाद मिरजच्या कै. रा. वि. भिडे मूक-बधिर शाळेच्या चार भिंतीत घुमत होता. निमित्त होतं एका ऐतिहासिक बदलाचं. ज्या मुलांना आपण समाजाच्या स्पर्धेत कुठेतरी मागे राहतील असं समजतो, त्याच मुलांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रोबोटिक्सच्या विश्वाचे दरवाजे उघडले जात होते.

हे स्वप्नवत वाटणारं कार्य सत्यात उतरवलं सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी. “आमची सांगली – सक्षम दिव्यांग आमचा अभिमान” हे केवळ ब्रीदवाक्य न ठेवता, त्यांनी ते कृतीत आणले. त्यांच्या संकल्पनेला पुण्याच्या ‘वरशिप अर्थ फाऊंडेशन’ने दिलेला प्रतिसाद म्हणजे या मुलांच्या नशिबात उगवलेली एक सोनेरी पहाट होती.

गेले १५ दिवस, रोज तीन तास, या शाळेतील वर्ग जिवंत झाले होते. इथल्या ७३ मुला-मुलींच्या हातांना जणू भविष्याला आकार देणारे पंखच फुटले होते.

* जेव्हा त्यांनी थ्री-डी प्रिंटरमधून गणपती बाप्पाची मूर्ती साकारली, तेव्हा तो केवळ एक प्रयोग नव्हता, तर त्यांच्या सुप्त सर्जनशीलतेला मिळालेला तो पहिला हुंकार होता.

* जेव्हा त्यांनी सेन्सॉरच्या मदतीने आग लागल्यास किंवा लाईट गेल्यास वाजणारा अलार्म बनवला, तेव्हा ते केवळ विज्ञान शिकत नव्हते, तर तंत्रज्ञान आपले मित्र आणि रक्षक कसे बनू शकते, याचा अनुभव घेत होते.

* जेव्हा त्यांनी चॅट-जीपीटीमध्ये स्वतः टाईप करून आपल्या मनातल्या कल्पनांना चित्रांचे रूप दिले, तेव्हा त्यांच्या भावनांना व्यक्त होण्यासाठी शब्दांची गरज उरली नाही. तंत्रज्ञानाने त्यांना नवी ‘भाषा’ दिली, नवा ‘आवाज’ दिला!

ज्या मुलांना आजवर फक्त सहानुभूती मिळाली, त्यांना या कार्यशाळेने आत्मविश्वासाची आणि समान संधीची ताकद दिली. STEM (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथेमॅटिक्स) सारख्या क्लिष्ट वाटणाऱ्या क्षेत्रांची दारे त्यांच्यासाठी उघडली गेली.

ही फक्त एक कार्यशाळा नव्हती; हा एका मोठ्या बदलाचा पाया आहे. ज्यांना ऐकू-बोलता येत नाही, त्यांच्यासाठी व्यक्त होण्याचा, शिकण्याचा आणि या डिजिटल जगात अभिमानाने वावरण्याचा हा एक नवा महामार्ग आहे. या ज्ञानाच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर, ही मुले उद्या केवळ स्वावलंबी होणार नाहीत, तर इतरांसाठी प्रेरणास्रोत बनतील.

कारण ते अपूर्ण नाहीत, ते स्वयंभू आहेत. आणि त्यांचा हा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे!

 

                                                   संप्रदा बीडकर

                                                    जिल्हा माहिती अधिकारी,

                                                सांगली

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!